Pandharpur, 20 July : आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपली यंत्रणा सज्ज केली आहे. शहरात सहा अग्निशमन वाहने, एक रेस्क्यू व्हॅन, १७ रेस्क्यू बोटी, १८० आपदा मित्र तैनात केले आहेत.चंद्रभागा नदी आणि पालखी मार्गावर यावर्षी प्रथमच सोलापूर जिल्ह्याचे स्वतःचे महिला बचाव पथक आणि बोट ॲम्ब्युलन्स कार्यरत असणार आहे.
आपत्कालीन व्यवस्थेकरिता पंढरपुरात सहा अग्निशमन वाहने आणि एक रेस्क्यू व्हॅन तैनात करण्यात आली आहे. रेस्क्यू व्हॅनचे इन्चार्ज पंढरपूर नगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी संभाजी कारले आहेत. प्रवासी वाहतूक करणाऱ्या होड्यांसाठी १०४५ लाईफ जॅकेट उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यासाठी जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता जेडे समन्वयकाची भूमिका निभावणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील ११, पुणे जिल्ह्यातील ०२ आणि एनडीआरएफच्या ०४ अशा एकूण १७ रेस्क्यू बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. रेस्क्यू बोटीसाठी शंभर लाईफ जॅकेट, तीस लाईफ रिंग, नऊ वॉकी-टॉकी, पाच मेगाफोन, चार इन्फ्लेटेबल टेंट, सहा मिमी स्टॅटिक रेस्क्यू रोप, पाच टॉर्च, दोन लेजर पॉइंटर व दोन लाईट बॅटन अशी सामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. या यंत्रणेचे इनचार्ज हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले आहेत.
चंद्रभागेत १८० आपदा मित्र
चंद्रभागा नदीत गस्त व बचाव कामासाठी १८० आपदा मित्रांचे नेमणूक करण्यात आली आहे. यात एनडीआरएफचे ३० जवान, ठाणे आपदा मित्रचे ०२, वाशीम जिल्हा आपदा मित्रचे १०, आपत्ती संघ पिंपरी-चिंचवडचे १०, वन्यजीव रेस्क्यू पुण्याचे १०, मुळशी आपत्ती समिती पुणेचे १०, हेल्पिंग हँड शिरोळ कोल्हापूरचे २०, सारथी फाउंडेशन सोलापूरचे १०, चंद्रभागा रेस्क्यू फाउंडेशन कान्हापुरीचे (जि. सोलापूर) १०, पंढरपूर शहरातील आदिवासी रेस्क्यू कोळी समाज होडीवाल्यांचे ३०, रेड फेरी ग्रुप सोलापूर या महिला रेस्क्यू पथकातील १५, महाराष्ट्र रेस्क्यू फाउंडेशन पंढरपूरचे ०५ आणि सोलापूर जिल्ह्यातील २० पोलिस पाटील यांचा समावेश आहे. यासोबतच वारी कालावधीसाठी दोन मेकॅनिक पंढरपूरमध्ये तैनात करण्यात आले आहेत.
महिलांचे बचाव पथक
आषाढी वारीत पहिल्यांदाच महिलांचे बचाव पथक सोलापूर जिल्ह्याचे स्वतःचे असणार आहे. या पूर्वी या पथकाने २०२५ मधील सीना नदीच्या पुरात दक्षिण सोलापूर तालुक्यातील ३०० नागरिकांच्या बचाव कार्यात सिंहाचा वाटा उचलला होता. तसेच कार्तिक वारी, २०२५ मधील चैत्र व माघ वारीतही या पथकाने बचाव कार्य केले आहे.
बोट ॲम्ब्युलन्स
रेड क्रॉसच्या माध्यमातून वैद्यकीय पथक उपलब्ध झाल्यास बोट ॲम्ब्युलन्स तयार असेल, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली. चंद्रभागा नदीपात्र व घाट परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी ही यंत्रणा २४ तास दक्ष असणार आहे.
पंढरपूर शहरातील सर्व खासगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवा
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर आणि परिसरात लाखो भाविक दाखल होतात, त्यामुळे आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध राहणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक हित लक्षात घेऊन, यात्रा कालावधीत म्हणजे येत्या 29 जुलैपर्यंत सर्व खासगी दवाखाने सुरू ठेवण्यात यावेत, असे आदेश उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.