Solapur, 27 October : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालकांवर सुरू असलेल्या सहकार कायदा कलम ८८ अन्वये कारवाईला स्थगिती मिळावी, यासह इतर विषयांसाठी माजी संचालक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक लढण्यासाठी माजी संचालकांसमोर कलम ८८ च्या कारवाईचा सर्वात मोठा अडथळा असून या भेटीच्या माध्यमातून हा अडथळा दूर करण्याची विनंती माजी संचालकांकडून केली जाणार आहे. आता त्यावर राज्याचे प्रमुख कसा तोडगा काढतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली माजी संचालकांचे हे शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार आहे. या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस काय शब्द देतात? यावर बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीतील उमेदवारी व चुरस अवलंबून असणार आहे.
बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती सुरू झाली आहे. येत्या शुक्रवारपर्यंत (ता. ३० ऑक्टोबर) अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीतील शब्दावर बँकेच्या निवडणुकीत भाजपसोबत राहायचे की भाजपच्या विरोधात राहायचे? याचेही कोडे सुटण्याची शक्यता आहे.
सलग १० वर्षांचे संचालकपद यामुळे अनेक मोठ्या नेत्यांना माघार घ्यावी लागल्याने सातारा जिल्हा बँकेची निवडणूक गाजली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत घेतलेले धाव यामुळे सांगली जिल्हा बँकेची निवडणूक गाजली.
सोलापूर जिल्हा बँकेत तर सलग संचालकपद, कलम ८८ ची कारवाई आणि बरखास्त झालेल्या संचालक मंडळातील सदस्यांना दोन टर्म निवडणूक लढण्यासाठी अपात्र करणे, अशा तीन मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
या सर्व गुंतागुंतीच्या मुद्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय तोडगा काढतात, याकडे सोलापूरसोबतच राज्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेले आहे. कारण सोलापूरच्या निर्णयाचा फायदा राज्यातील इतर सहकारी बॅंकांना लागू होऊ शकतो, त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या अडचणीत असलेल्या संचालकांसाठी मुख्यमंत्र्यांचा तोडगा काय असणार, याची प्रचंड उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.