Ajit Kulkarni-Raj Thackeray
Ajit Kulkarni-Raj Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

माजी मनसैनिकाचे खुद्द राज ठाकरेंना आव्हान; सोलापुरात ताफा अडविण्याचा इशारा

विश्वभूषण लिमये

सोलापूर : मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतलेल्या भूमिकेचा फटका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच (MNS) बसल्याचे दिसून येत आहे. अनेक निष्ठावंत मुस्लीम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला. तसेच वसंत मोरे (vasant more) यांच्यासारख्या नगरसेवकानेही राज ठाकरेंचा उपक्रम राबविण्याबाबत नकार दिला होता. आता सोलापुरातील (solapur) माजी मनसैनिकाने तर राज यांना खुले आव्हान दिले आहे. मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी खुद्द राज ठाकरेंनी सोलापुरात यावे; त्यांचा ताफा आम्ही अडवू, असा इशारा माजी मनसैनिक तथा प्रहार संघटनेचे सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी दिला आहे. (Former Mansainika's challenge to Raj Thackeray: Warning to stop Motor in Solapur)

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. हनुमान जयंतीनिमित्त पुण्यात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ठाकरे हे पुण्यात आहेत. मात्र, भोंग्याच्या मुद्यावरून माजी मनसैनिक असलेले कुलकर्णी यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं आहे.

सोलापूर प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी ‘मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरे यांनी स्वतः सोलापुरात यावे. त्यांचा ताफा मी अडवेन, असे त्यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे हे मुख्यमंत्री, पंतप्रधान नाहीत, त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश देण्यापेक्षा स्वतः मैदानात उतरावं, असे आव्हान त्यांनी राज ठाकरे यांना दिले आहे.

राज ठाकरे हे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर काँग्रेस आणि आता भारतीय जनता पक्षाचे बोलके पोपट म्हणून काम करत आहेत, अशी जहरी टीकाही अजित कुलकर्णी यांनी केली आहे. प्रहार संघटनेच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी शनिवारी (ता. १६ एप्रिल) इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.

अजित कुलकर्णी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर शहर उपाध्यक्ष म्हणून तीन वर्ष काम पाहिले आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी मनसेने टोलप्रश्न हाती घेतला होता. त्यावेळी टोल फोडल्यानंतर अजित कुलकर्णी यांचा राज ठाकरे यांनी मुंबईला बोलावून सत्कार केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT