कराड : माजी क्रीडा राज्यमंत्री जनार्दन उर्फ श्यामराव बाळकृष्ण आष्टेकर (91) यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. आष्टेकर हे 1985 आणि 1990 असे सलग दोन टर्म कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यांनी नऊ वर्षे क्रीडा, सांस्कृतिक व उद्योग विभागाचे राज्यमंत्रिपद भूषविले होते.
आष्टेकर यांचा जन्म 2 ऑगस्ट 1934 रोजी कराड येथे झाला. कराडमधील प्रसिद्ध टिळक हायस्कुलमधून त्यांनी शिक्षण घेतले. तरुण वयातच त्यांनी नगरपालिकेच्या राजकारणात उडी घेतली. त्यांनी 10 वर्षे कराडचे उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. 1985 आणि 1990 असे सलग दोन टर्म कराड उत्तरचे आमदार म्हणून काम केले. शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत अशी त्यांची ओळख होती.
1985 मध्ये शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसकडून त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. त्यात काँग्रेसचे दिग्गज नेते पी. डी. पाटील यांचा पराभव करून त्यांनी विजय मिळवला. 1990 च्या निवडणुकीपूर्वी पवार यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे 1990 मध्येही आष्टेकर यांना काँग्रेसकडून तिकीट मिळाले. त्यावेळीही ते विजयी झाले.
आष्टेकर यांनी सुरुवातीपासून 9 वर्षे क्रीडा, सांस्कृतिक व उद्योग विभागाचे राज्यमंत्रिपद भूषविले. त्या काळात त्यांनी साताऱ्याचे आणि धाराशिवचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी पार पाडली. श्यामराव आष्टेकर यांच्या कार्यकाळातच कराडला एमआयडीसी झाली. क्रीडामंत्री म्हणून काम करताना त्यांनी शरद पवार यांच्या मार्गदर्शनात पुण्यातील बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारले.
1999 नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय राहिले, पण निवडणुकीच्या राजकारणापासून त्यांनी अंतरच ठेवले. त्यांनी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन, भारतीय ऑलिंपिक संघटना, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनसारख्या विविध संघटना, संस्थेवर संचालक म्हणून काम केले. खेळाचा सर्वांगीण विकासात त्यांचा बहुमूल्य वाटा आहे.
अत्यंत साधा माणूस अशी त्यांची प्रतिमा होती. निष्कलंक, निष्ठावान व समाजाभिमुख नेता अशी ओळख होती. त्यांनी त्यांच्या आमदारकीचा आणि मंत्रीपदाचा कधीही डौल मिरवला नाही. 1990 च्या दशकात मंत्री असताना कराड शहरातील लोकांनी आष्टेकर यांना लुना गाडीवरून फिरताना बघितले आहे. त्यांच्या साध्या राहणीमानाचे नेहमीच कुतूहल वाटायचे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.