Satara DCC Bank Election Update Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara DCC Bank Election Update : सातारा DCC बॅंकेच्या जागा वाटपाची सूत्रे शिवेंद्रराजे, मकरंदआबा, रामराजे अन्‌ उंडाळकरांच्या हाती : 10 वर्षांच्या नियमाने टेन्शन वाढविले

Mahayuti Seat Allocation News : दहा वर्षांच्या संचालक कार्यकाळाच्या निर्बंधामुळे सातारा जिल्हा बँकेतील महायुतीचे जागावाटप आणखी अडचणीचे झाले आहे. विजयादशमी जवळ येऊनही तोडगा निघालेला नाही. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मकरंद पाटील यांची भूमिका निर्णायक असणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 19 October : सलग 10 वर्षे संचालक राहिलेल्या नेत्यांना आता कायद्याने सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सातारा जिल्हा बॅंकेतील जागा वाटपाचा मुद्दा महायुतीच्या मातब्बरांची डोकेदुखी वाढवणारी ठरणार आहे. घटस्थापनेला जागा वाटप होईल, असे वाटत असतानाच प्रत्यक्षात विजयादशमी आली तरी जागा वाटप होऊ शकलेले नाही. कोणाकडे किती ठराव आणि त्यानुसार जागा वाटप या सुत्रापुढे अजूनही महायुतीची गाडी जाऊ शकलेली नाही. मात्र, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांची भूमिका कळीची तितकीच महत्वपूर्ण ठरणार आहे.

सातारा जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक, उपाध्‍यक्ष अनिल देसाई आणि राजेंद्र राजपुरे यांच्‍या याचिका सर्वोच्च न्‍यायालयाने फेटाळल्‍याने सर्वच दिग्‍गजांचे टेन्‍शन वाढले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित दोन्ही नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. ता. 21 ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे, त्यामुळे सर्वांच्या नजरा जागा वाटपाच्या बैठकीकडे लागल्या आहेत.

जिल्हा बॅंकेच्या या वेळच्या निवडणुकीला 10 वर्षांच्या अपात्रतेचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आलेला आहे. त्याचा फटका दिग्गज संचालक राजेंद्र राजपुरे, अनिल देसाई यांना बसला आहे. आता उर्वरित संचालकांच्या बाबतीत अशी तक्रार झाल्यास त्यांच्यावरही अपात्रतेची तलवार टांगती राहणार आहे. त्यामुळे सर्वांनीच सावध भूमिका घेतल्याचे चित्र आहे.

अद्यापपर्यंत डी. के. पवार आणि सातारा सोसायटी मतदारसंघातून बाबासाहेब शिवाजी कदम या दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. उर्वरित ठिकाणी मोठी अपेक्षा बाळगून नेतेमंडळी बसलेले आहेत. कारण निवडणूक बिनविरोध करायची असेल तर माघार मोठ्या प्रमाणात घ्यावी लागणार आहे.

बॅंकेची निवडणूक ही महायुती एकत्र लढत आहे. त्यासाठी जागा समन्वयाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्यावर आहे. आतापर्यंत सोसायटी वगळता उर्वरित दहा जागा वाटपाबाबत एक-दोन बैठका झाल्या आहेत. त्यामध्ये या दोन्ही नेत्यांनी सर्वांचे म्हणणे जाणून घेतले आहे. आता जागा वाटपाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महायुतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या शिवसेनेला किती जागा सोडल्या जाणार? भाजप स्वत:ला किती जागा घेणार आणि उपमुख्‍यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळणार? याची उत्सुकता आहे. सध्याची बदललेली परिस्थिती लक्षात घेता सावधगिरीनेच महायुतीचे जागा वाटप होणार, हे मात्र निश्चित आहे.

ठरावांची संख्या कळीचा मुद्दा

जिल्हा बॅंकेत ठरावांच्या संख्याबळानुसार जागा वाटपाचे सूत्र असणार आहे. त्यानुसार भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे ठरावांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ॲड. उदयसिंह पाटील, मकरंद पाटील, रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातच जागा वाटपाचे सूत्र ठरण्याची शक्यता अधिक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT