Girish Jadhav, eknath shinde
Girish Jadhav, eknath shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar News : नगरच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना करून दिली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या'घोषणेची आठवण

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar To Be Renamed As Ahilyanagar : अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी नगर केलं जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात केली. औरंगाबद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगरमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. पण मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या या घोषणेवर शिवसेनेच्या नेत्यानं नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी पत्रक काढून निषेध नोंदवला आहे.

"अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी नगर न करता अंबिका नगरच करा," असा सल्ला शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

जाधव यांनी एकनाथ शिंदेंना एका सभेची आठवण करुन दिली आहे. १९९५ मध्ये नगरच्या वाडीया पार्क मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या झालेल्या विराट सभेची आठवण जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना करुन दिली आहे.

त्यांचे नेतृत्व तुम्ही अमान्य करता का?

"आमचे आणि आपलेही(मुख्यमंत्री शिंदे)श्रद्धास्थान हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नगरचे नाव बदलून अंबिकानगर केले होते. त्या घोषणेला शिंदे साहेब तुम्ही हरताळ फासत आहात. म्हणजे त्यांचे नेतृत्व तुम्ही अमान्य करता आहात का? केवळ मतांच्या राजकारणापायी शिवसेनाप्रमुखांचा आदेश तुम्ही मानत नाहीत आहात, याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा," असा खोचक सवाल गिरीश जाधवांनी यांनी उपस्थित केला आहे.

नगरबाबतही तेच होण्याची शक्यता..

"धनगर समाजाच्या भावनांचा आम्ही आदरच करतो. पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ज्याप्रमाणे सुंदर शहरे बनवली. त्याप्रमाणे नगर जवळ एक स्मार्ट सिटी उभारून त्याला त्यांचे नाव दिले असते तर छान झाले असते. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शहरांची नावे बदलण्याबाबतच्या याचिकेवरील सुनावणीमध्ये या नामांतराला स्थगिती दिली आहे. वास्तविक धाराशिव, संभाजीनगर ही नावे बदलण्याची घोषणा अनेक वेळा झाली पण ती प्रत्यक्षात उतरली नाहीत. त्यावरून सत्तांतर झाले आणि पुन्हा नावे पूर्ववत झाली. नगरबाबतही तेच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पोळी न भाजता नगरचे नाव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार अंबिकानगर करावे, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT