Girish Mahajan - Gulabrao Patil
Girish Mahajan - Gulabrao Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, किशोर पाटील यांना जळगाव जिल्ह्यातून मंत्रिपदाची माळ?

कैलास शिंदे :सरकारनामा ब्युरो

Cabinet expansion : जळगाव - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाचा उद्या (ता. 9) विस्तार होत आहे. जळगाव जिल्ह्यातून भाजपतर्फे आमदार गिरीश महाजन ( Girish Mahajan ) तर शिंदेगटातर्फे माजी मंत्री गुलाबराव पाटील व पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. सकाळी ९ वाजता सह्याद्री बंगल्यावर उपस्थित राहण्याचे फोन शिंदे गटातील आमदारांना आले आहे.

राज्यातील सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार उद्या होणार आहे. सकाळी अकरा वाजता मुंबईत शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हयातून शिंदे गट व भाजपकडून कोणाची वर्णी लागणार आहे. भारतीय जनता पक्षातर्फे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव निश्‍चित झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. फडणवीस यांचे ते विश्‍वासू आहेत. शिवाय भाजपच्या अनेक संकट काळात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याही ते विश्‍वासाती मानले जातात त्यामुळे त्याची मंत्रिपदावर वर्णी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाजन सध्या मुंबईतच आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तो होवू शकला नाही. शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे जळगाव जिल्ह्यातून दोन मंत्रिपद देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना मंत्रिपदाचा त्याग करून गुलाबराव पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले होते. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद निश्‍चित असल्याचे मानले जात आहे. पाटील सद्यस्थितीत मुंबईतच आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता, आपल्याला सकाळी नऊ वाजता सह्याद्री बंगल्यावर बैठकिसाठी उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र आपणास मंत्रीपदाबाबत काहीही कळविलेले नाही. गुलाबराव पाटील हे शिवसेना भाजप युतीमध्ये सहकार राज्यमंत्री होते, महाविकास आघाडीच्या मंत्री मंडळात राज्याचे ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री तसेच जिल्हयाचे पालकमंत्री होते.

या काळात त्यांनी आपल्या मंत्रीपदाचे कार्य अत्यंत चांगल्या पध्दतीने पार पाडले होते. पाणी पुरवठा योजनेसाठी त्यांनी ग्रामपंयतींना निधीही उपलब्ध करून दिला होता. तसेच पालकमंत्री म्हणून काम करतांना त्यांनी नियोजन मंडळातून निधी देण्याबाबत नियोजन करून समन्वय ठेवला होता. तसेच विधीमंडळात विश्‍वासमताच्या वेळी झालेल्या भाषणात त्यांनी शिंदे गटाची बाजू व्यवस्थित मांडली होती. त्यांनी आक्रमकपणे ही बाजू मांडून आपली छाप निर्माण केली होती.त्यामुळे मंत्रीमंडळात त्यांचे स्थान निश्‍चित मानले जात आहे.

किशोर पाटलांनी संधी?

पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांना मंत्रीमंडळात शिंदे गटाकडून राज्यमंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. किशोर पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत निकटचे मानले जात आहे. राज्याचे नगरविकास मंत्री असतांना शिंदे यांनी अचानक जळगाव जिल्हा दौरा करून पाचोरा येथे भेट दिली होती. या दौऱ्यात शिंदे यांनी पाचोऱ्यातील एका देवस्थानाला भेट देवून दर्शन घेतले होते. त्यावेळी आमदार किशोर पाटील उपस्थित होते. यानंतर त्याची चर्चा झाली होती. कालातंराने राज्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केले,त्यावेळी किशोर पाटील त्यांच्या समवेत होते. राजकीय घडमोडीनंतर शिंदे यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपद निवड झाली. याचे रहस्य शिंदेच्या पाचोरा भेटीत असल्याची चर्चा आहे, त्यामुळे किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

याबाबत आमदार किशोर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आपल्याला सकाळी 9 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर उपस्थित राहण्याबाबत फोन आला आहे. मात्र मंत्रिपदाबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही, मात्र आपल्याला संधी मिळण्याची अपेक्षा आहे, ते मिळाल्यास आपण विश्‍वास सार्थ करून दाखवू.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT