Satara Loksabha News : खासदार उदयनराजे भोसले यांनी तिकीट मागण्याची गरज नाही, तसेच त्यांचे तिकीट नाकारण्याचाही विषय नाही. सध्या महायुतीतील तीन पक्षात जागावाटपावरून ताणाताणी सुरू आहे. यासाठी दिल्लीतील पार्लमेंटरी बोर्डसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची चर्चा सुरू आहे. वाटाघाटी सुरू असून, त्यांचे तिकीट निश्चित आहे. लवकरच पुढची यादी येईल, असा विश्वास भाजपचे नेते व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी साताऱ्यात व्यक्त केला. Girish Mahajan on Udayanraje Bhosale
मंत्री गिरीश महाजन यांनी आज खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी तासभर बंद दाराआड चर्चा केली. यानंतर महाजन (Girish Mahajan) यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. गिरीश महाजन म्हणाले, काल मी माढा मतदारसंघातील नेते मोहिते-पाटील यांच्याकडे आलो होतो. तेथील चर्चा झाल्यानंतर मी उदयनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. उदयनराजेंचे आणि माझे कॉलेजपासूनचे जुने संबंध आहेत. सध्या लोकसभेच्या निवडणुका लागल्या आहेत. यासाठी महाराजांचाही पक्षाला फायदा झाला पाहिजे. तसेच निवडणुकीत (Election) त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे. त्यांच्या नावाचे एक वलय आहे. त्यांचा जास्तीत जास्त मतदानासाठी उपयोग करून घेता येईल. याबाबत आमच्यात चर्चा झाली. प्रचारासाठी महाराष्ट्रात महाराज कुठं कुठं वेळ देणार याचा विचार आम्ही केला.Girish Mahajan on Udayanraje Bhosale :
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपच्या (BJP) मागील दोन उमेदवारांच्या यादीत उदयनराजेंच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक आहेत, नेमके काय कारण आहे, या प्रश्नावर गिरीश महाजन म्हणाले, आमच्या महायुतीत तीन पक्ष आहेत. त्यांच्यात वाटाघाटी चालली आहे. उदयनराजेंनी तिकीट मागण्याची गरज नाही किंवा त्यांचे तिकीट नाकारण्याचा विषय नाही. सध्या जागावाटपावरून तीन पक्षात ताणाताणी सुरू आहे. त्यांना तिकीट निश्चित आहे. पण, दिल्लीतून आमचे सगळं ठरतं. तीनही पक्षांचे नेते दिल्लीतील पार्लमेंटरी बोर्डाशी बोलत आहेत. उमेदवारीबाबत पार्लमेंटरी बोर्ड सगळं ठरवते. सध्या आचारसंहिता लागू झाली आहे. लवकरच पुढील निर्णय होईल आणखी एक यादी येईल, असे त्यांनी नमूद केले.
माढ्यातील ( Madha ) तिढा सुटला का, या प्रश्नावर गिरीश महाजन म्हणाले, माढ्यातील प्रश्नाबाबत मी विजयसिंह दादांना भेटलो. तेथील कार्यकर्त्यांचा आग्रह होता, खूप गर्दीही होती. निंबाळकरांबाबत तणाव आहे. तिकिटाबाबत वेगळे म्हणणे होते. पण आमची सविस्तर चर्चा झाली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) चर्चा करून निर्णय घेतील.
उदयनराजेंचे तिकीट डावलले तर मराठा समाज नाराज होईल, या प्रश्नावर गिरीश महाजन म्हणाले, तशी वेळ येणार नाही. तिकीट नाकारले असं का सांगता, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. भाजपच्या पहिल्या यादीत उदयनराजेंचे नाव नाही यावर विचारले असता, गिरीश महाजन म्हणाले, उद्धव ठाकरेंनी गडकरींबाबत ( Nitin Gadkari ) किती आकांडतांडव केला होता. ते तर जुने नेते आहेत. प्रत्येकाची वेळ असते. आमच्याकडे पार्लमेंटरी बोर्ड आहे. एकट्या भाजपची ही जबाबदारी असती तर मध्य प्रदेश, गुजरातसारखे असते तर वेगळा विषय होता. पण, आता लवकरच हा निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले. मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. यावर गिरीश महाजन म्हणाले,
आपल्याकडे लोकशाही आहे, कुणालाही उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अधिकार आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी आमचा कोणताही विरोध नाही.
प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी भाजपकडून तुम्हालाच चर्चेला पाठवले जाते. याबाबत गिरीश महाजनांनी सांगितले की, प्रत्येक प्रश्नाचा तिढा सोडवण्यासाठी भूमिका घ्यावी लागते. मी आज वेगळ्या कारणांसाठी भेटायला आलो आहे. भेटल्यामुळे चर्चा प्रश्न सुटत असतात. मार्ग निघत असतो. मी चर्चा करण्याचे काम करतो. मात्र, इथला हा प्रश्नच नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Edited By : Rashmi Mane
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.