Kolhapur News : संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कालपासून महायुतीच्या गोटात अनेक नावांची चर्चा सुरू होती. मात्र, आता महायुतीकडून माजी आमदार राजेश पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून राजेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर त्यांच्या विरोधात काँग्रेस आघाडीकडून शशिकांत पाटील चुयेकर यांनी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान, चार शासननियुक्त संचालकांची साथ मिळाल्यास राजेश पाटील हे गोकुळचे अध्यक्ष होतील, अशी जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. चंदगड तालुक्याच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार असल्याचे संकेत मिळत असतानाच महायुतीकडून अध्यक्षपदाच्या वाटपाचा एक फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या फॉर्म्युल्यानुसार, महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना अध्यक्षपदाची संधी मिळणार असून, गोकुळच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ सव्वा-सव्वा वर्षांसाठी वाटून घेतला जाणार आहे. त्यामुळे पाच वर्षांच्या कालावधीत तीन किंवा चार अध्यक्षांची नियुक्ती होऊ शकते. महायुतीच्या बैठकीत याबाबतचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते.
या फॉर्म्युल्यानुसार पहिली संधी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असून, त्यानंतर भाजप, शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला अध्यक्षपदाची संधी दिली जाणार आहे. याच सूत्रानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांना पहिली संधी देण्यात आली असून, त्यांनी अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळावर राज्य सरकारने शिवाजी दिनकर आडनाईक, डॉ. प्रवीणचंद्र रंगनाथ हेंद्रे, प्रशांत भगवान पाटोळे आणि कृष्णात ज्ञानदेव पाटील यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. या चारही सदस्यांना मतदानाचा अधिकारही देण्यात आला आहे.
दरम्यान, गोकुळ दूध संघाची निवडणूक २५ जागांसाठी झाली होती. या निवडणुकीत समविचारी आघाडीचे १३, तर महायुतीचे १२ संचालक निवडून आले होते. संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीवेळी समविचारी आघाडीचे १३ संचालक उपस्थित होते. मात्र, गोकुळच्या कायद्यानुसार अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आवश्यक असलेली १४ सदस्यांची गणपूर्ती पूर्ण होत नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी बैठक तहकूब केली होती.
यानंतर समविचारी आघाडीने कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. न्यायालयाने १० नोव्हेंबर रोजी संचालक मंडळाची बैठक बोलावण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार निवडून आलेल्या सर्व २५ संचालकांना उद्याच्या बैठकीला उपस्थित राहण्याबाबतचे पत्र पाठवण्यात आले आहे. आता या बैठकीत अध्यक्षपदाची निवड कशी पार पडते आणि महायुतीचा ठरलेला फॉर्म्युला प्रत्यक्षात कितपत यशस्वी ठरतो, याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.