Gokul Controversy; Hasan Mushrif, Chandrakant Patil And Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil : गोकुळसाठी कायदा बदलण्याचं षडयंत्र दोघांचं, महायुतीच्या बड्या नेत्यांवर बंटी पाटलांनी फोडलं खापर; 'कॅबिनेटमध्ये कुणीच बोललं नाही'

Satej Patil Targets Mahayuti Minister Chandrakant Patil and Hasan Mushrif Over Gokul Law : ‘गोकुळ’मध्ये शासननियुक्तांना मतदानाचा अधिकार देणारा निर्णय कालच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. यावरून वाद चांगलाच सुरू झाला असून काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी बदलेल्या कायद्यावरून मोठे भाष्य केले आहे.

Aslam Shanedivan

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा दूध संघ म्हणजेच गोकुळवर चार शासननियुक्त संचालक आणि एक शासकीय अधिकारी असे पाच जण संचालक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी (ता. ४) मंत्रिमंडळात घेतला. गोकुळमध्ये अध्यक्षपद मिळवण्यासाठी आणि सत्ता स्थापन करण्यासाठी कायदाच बदलण्यात आल्यावरून जोरदार वादंग सुरू झाला आहे. यावरून आता काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत, ‘कायदा कोणी बदलला?’ असा सवाल उपस्थित केला. तसेच महायुतीचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि हसन मुश्रीफ यांची नावे थेट घेत त्यांचाच यात हात असल्याचा आरोप केला आहे.

महायुती सरकारने सत्तेचा गैरवापर करून ‘गोकुळ’वर मतदानाचा अधिकार असलेले चार अशासकीय सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय घेत लोकशाहीचा खून केला आहे. सत्तेच्या हव्यासापोटी सर्वसामान्यांच्या भावना पायदळी तुडवून सरकार किती टोकाचे निर्णय घेऊ शकते, याचा पुरावाच या निर्णयातून मिळाला आहे. ‘गोकुळ’साठी भविष्यात रस्त्यावरची लढाई लढू. कोल्हापूरवासीयांची मने दुखावणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना जनता माफ करणार नाही, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी (ता. ४) कॅबिनेट बैठकीतील निर्णयानंतर दिला होता.

यानंतर गुरुवारी (ता. ५) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पुन्हा एकदा मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. हा कायदा बदलण्यासाठी मुश्रीफ आणि पाटील यांनीच पुढाकार घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. या निर्णयाचा निषेध करत कॅबिनेटचा निर्णय हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचे सतेज पाटील म्हणाले. एका बाजूला मतदारांचा कौल मान्य करायचा नाही आणि दुसऱ्या बाजूला तांत्रिक मुद्दा उपस्थित करून बहुमत स्वतःकडे वळवून घेण्याचा प्रयत्न करायचा, असा प्रकार सुरू आहे. महाराष्ट्रातील जनता हे सर्व पाहत आहे. भविष्यात या सरकारला त्याचे उत्तर द्यावेच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

‘साडेपाच लाख शेतकऱ्यांचे हित गोकुळशी जोडलेले’

साडेपाच लाख शेतकऱ्यांचा संसार ‘गोकुळ’वर अवलंबून आहे. दर दहा दिवसांनी शेतकऱ्यांच्या कष्टाचे १०० कोटी रुपये त्यांना दिले जातात. दररोज २० लाख लिटर दूध संकलित करणारा ‘गोकुळ’ हा अमूलनंतर देशातील सर्वात मोठ्या दूध संघांपैकी एक आहे. त्यामुळे हा संघ शेतकऱ्यांच्याच मालकीचा राहावा, यासाठी आमची लढाई सुरू आहे, असे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी दिलेला कौलही सरकार नाकारत असल्याचे राहुल गांधी यांनी ट्विट करून आमच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. देशातील शेतकरी आज अडचणीत असताना त्यांनी दिलेला कौल नाकारण्याचे काम सरकार करत आहे. या विषयावर राहुल गांधी यांनी आमच्या बाजूने भूमिका मांडली. त्याबद्दल साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो, असेही पाटील म्हणाले.

‘कायदा बदलण्यामागे मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील’

हा कायदा बदलण्यामागे हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांची महत्त्वाची भूमिका आहे. या दोघांनीच या निर्णयासाठी प्रामुख्याने पुढाकार घेतला. कायदा बदलण्याचे संपूर्ण षड्यंत्र या दोघांच्या माध्यमातून रचले गेले, असा आरोप सतेज पाटील यांनी केला. विशेष म्हणजे, कालच्या कॅबिनेट बैठकीत या विषयावर कोणीही चर्चा केली नाही, असा दावाही त्यांनी केला.

हा कायदा करण्याची गरज काय होती? त्याचे महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहेत? हा निर्णय लोकांना मान्य होणार आहे का? मुळात हा कायदा चुकीचा आहे. कायदा करताना त्याची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने (Retrospective Effect) कशी करता येईल? निवडणुकीपूर्वी हा कायदा झाला असता, तर समजण्यासारखे होते. मात्र, निवडणूक झाली, निकाल लागला आणि तो आपल्या बाजूने लागला नाही म्हणून कायदा बदलून त्याची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करण्याचा प्रयत्न केला जात आहे. केवळ सत्ता मिळवायची आहे, या हव्यासापोटी हा दुर्दैवी प्रकार सुरू आहे. हे चुकीचे आहे. ‘अभी दोस्ती कैसी, दोस्ती में गद्दारी हुई,’ अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

‘मतदारांनी नाकारलेले उमेदवार तज्ज्ञ कसे?’

तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्तीच्या नियमावरूनही सतेज पाटील यांनी सरकारला लक्ष्य केले. ज्यांना साडेपाच हजार मतदारांनी नाकारले, ते तज्ज्ञ कसे असू शकतात? मतदारांनी मतदानातून नाकारलेले उमेदवार तज्ज्ञ कसे ठरू शकतात? ते खरोखरच तज्ज्ञ असते, तर लोकांनी त्यांना निवडून दिले नसते. मग तेही तुमच्या बारा संचालकांमध्ये आले असते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महायुतीच्या संचालकांना आधी गोव्याला, त्यानंतर सुरतला आणि आता उदयपूरमधील मेरियट हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. हवे असल्यास त्यांच्या रूम नंबरही सांगू का, असा सवाल करत महायुतीच्या संचालकांचीही हा प्रकार योग्य पद्धतीने व्हावा, अशी इच्छा असल्याचा दावा सतेज पाटील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT