Gokul Dairy Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Election : 'गोकुळ'चा गुंता सुटणार? महायुतीत आता जागावाटपाचा फॉर्म्युला; ठरावांचा दबाव बॅकफुटवर!

gokul election seat sharing formula : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणुकीत महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरण्याच्या हालचाली वेगात; ठरावांच्या दबावाचा राजकीय गेम आता बॅकफुटवर.

Rahul Gadkar

गोकुळ दूधसंघाची निवडणूक महायुती म्हणून लढायचे असे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र जागावाटप कोणात्या सूत्रानुसार होणार? याकडे इच्छुक आणि सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे. गोकुळमधील जागावाटप हे ठरावांच्या संख्येवर व्हावे अशी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी आहे. मात्र महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला कोणत्या आधारे करायचा याबाबत चर्चा सुरु आहे. मात्र भाजप आणि शिवसेनेच्या गोठात पक्षनिहाय जागावाटप करण्याची भूमिका आहे. त्याच पद्धतीने जागावाटप होण्याचे संकेत मिळत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांना जिल्ह्यातील आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या गोकुळ आणि महत्त्वाचा सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. विधानसभा निवडणुकीपेक्षा गोकुळच्या संचालक पदाला महत्त्व अधिक असल्याने अनेक जण या निवडणुकीत सर्वोतोपरी तयारीनिशी मैदानात उतरताना पाहायला मिळाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे झाल्याने गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती म्हणूनच लढवण्यासाठी घटक पक्षातील सर्वच नेते प्रयत्नशील आहेत.

जिल्ह्याचे राजकीय आणि आर्थिक केंद्राचे मूळ गोकुळ दूध संघ असल्याने सर्वांमध्ये याठिकाणी सत्तेवर जाण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. मागील निवडणुकीत महाडिक गट, दिवंगत नेते आमदार पी. एन. पाटील वगळता सर्वच नेते महाविकास आघाडी म्हणून एकत्र होते. केवळ महाडिक यांना विरोध म्हणून आमदार डॉ. विनय कोंरे, आमदार सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदिप नरके, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार राजेश पाटील, के. पी. पाटील, माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासह अनेक दिग्गज एकत्र होते.

मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता केवळ आमदार सतेज पाटील वगळता सर्वच नेते महायुती म्हणून एकत्र असणार आहेत. तत्कालीन वेळी मल्टीस्टेटला विरोध आणि महाडिक नको म्हणून एकत्र आल्याने जागावाटप संदर्भात फारशी तानातानी झाली नाही. पण यंदा महायुती म्हणून ही निवडणूक लढवायची असल्याने सर्वांनाच सत्तेमध्ये समान वाटा हवा आहे. मागील निवडणूक विरोध म्हणून गाजली होती. पण यंदा विरोधकांवर आक्षेप घेणे इतके महत्त्वाचे कारण नसल्यामुळे यंदा महायुतीच्या घटक पक्षांमध्येच रस्सीखेच सुरू आहे.

अशातच गोकुळ दूध संघावर वर्चस्व आणि महायुतीमध्ये नेतृत्वावरून स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वाधिक संचालक आपलेच असावेत असा सर्वांचाच अट्टाहास आहे. त्यामुळे जागा वाटपामध्येच पहिली लढाई जिंकण्याचा प्रयत्न सर्वच नेत्यांकडून सुरू आहे. त्यामुळे ठरावाच्या जोरावर उमेदवारी घ्यावी, अशी अट मंत्री मुश्रीफ यांच्याकडून ठेवली जात आहे. तर महायुतीमध्ये घटक पक्षांना समान संधी ठेवण्याचा भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांचा आहे.

सर्वाधिक ठराव ज्याच्याकडे असणार त्याला अधिक जागा असा निर्णय झाला तर या पाच वर्षात बदलत्या राजकीय समीकरणांनुसार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे गोकुळ मधील मातब्बर संचालकांचा पक्ष प्रवेश झालेला आहे. तर गोकुळ दूध संघाच्या बाराशे सभासदा संदर्भात कोल्हापूर सर्किट बेंच येथे याचिका दाखल आहे. यामध्ये सर्वाधिक ठराव हे मंत्री मुश्रीफ गटाचे आहेत. दावा प्रति दावा करून आरोप प्रत्यारोप झाले तरी शेतकऱ्यांच्या हितापेक्षा गोकुळ मधील ठराव धारांची संख्या वाढवणे हे महत्त्वाचे आहे. जर न्यायालयीन लढाई लढून हे सभासद वाचवण्यात यश आले तर मंत्री मुश्रीफ यांच्याकडे ठराव धारकांची संख्या निर्णायक ठरणार आहे.

त्यामुळे साहजिकच मंत्री मुश्रीफ यांच्या या मागणीला महायुतीतील घटक पक्षांकडून विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेकडून पक्षनिहाय जागावाटप होण्यावर भर दिला जात आहे. त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे समान जागांवर, शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर तर जनसुराज्य शक्ती चौथ्या स्थानावर राहणार आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू आघाडीला स्वतंत्र एक जागा मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT