Gokul Dudhsang 2026 Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Milk News: ना चौकशी, ना नोटीस; गोकुळच्या 427 संस्थांना अपात्र ठरवल्याने संताप, संस्था चालक न्यायालयात जाणार

kolhapur Gokul Milk 427 Societies Disqualified : गोकुळ दूध संघाच्या 427 संस्थांना मतदानासाठी अपात्र ठरवल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. चौकशी व नोटीस न देता निर्णय घेतल्याचा आरोप करत संस्थाचालकांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: गोकुळ दूध संघामधील 427 संस्था मतदानास अपात्र केल्यानंतर गोकुळच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मंगळवारी दिवसभर काही संस्था चालकांनी गोकुळ कार्यालयात भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. या संस्थेची ना चौकशी झाली, ना अपात्र करण्यासंदर्भातील नोटीस संस्थांना आली. असा मुद्दा घेऊन संस्थाचालक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात न्यायालयात धाव घेण्याचा इशारा संस्था चालकांनी दिल्याने पुन्हा एकदा गोकुळचे राजकारण ढवळणार आहे.

द्विसदस्यीय चौकशी समितीकडून चौकशी पूर्ण झालेली नाही. तुमची संस्था निवडणुकीसाठी अपात्र का ठरवू नये, अशी एकही नोटीस नाही. याबाबत आम्हाला कल्पना दिलेली नाही. ठराव पत्रांसह मसुदा पाठविण्याच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी ४२७ संस्थांचा मतदानाचा अधिकार का काढून घेतला, असाही सवाल उपस्थित होत आहे.

काही दूध संस्थांचे प्रतिनिधी तर काही नेत्यांचे कार्यकर्ते आज सहाय्यक निबंधक (दुग्ध) कार्यालयात ये-जा करत होते. याबाबत आपण न्यायालयात जाऊ असेही ते सांगत होते. मात्र, याबाबत सहाय्यक निबंधकांच्या कार्यालयातून उपनिबंधकांनी दिलेला आदेश असल्याचे सांगितले जात होते.

दरम्यान, एखाद्या संस्थेचा मतदानाचा अधिकार काढून घेतल्यास ते सभासद राहणार नाहीत. त्यामुळे त्यांचे सभासदत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. तसेच सभासद असल्यास त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, तो नाकारला जात असल्यास संस्था सभासदत्व ही धोक्यात आल्याचा मुद्दा उपस्थित होत आहे. संघाच्या निवडणुकीच्या ठरावावर हरकतीवेळी या संस्थांना हरकत मांडता येणार आहे.

किती संस्था पात्र-अपात्रबाबत संदिग्धता सहाय्यक निबंधक (दुग्ध) कार्यालयात आतापर्यंत गैरहजर राहिलेल्या संस्थांच्या सुनावण्या आजही सुरूच राहिल्या. १३२० अवसायनातील संस्थांमधील काही संस्था मतदानास अपात्र ठरवलेल्या ४२७ च्या यादीत आहेत. त्यामुळे ५४७० या गोकुळ दूध संघाच्या मूळ मतदार यादीतील किती संस्था मतदानास पात्र ठरल्या, हे अद्याप सहाय्यक निबंधक (दुग्ध) कार्यालयाकडून स्पष्ट झालेले नाही. ठराव, मागणी पत्रे आणि मसुदा पाठविण्याची मुदत संपली आहे. मात्र, अवसायनातील संस्थांच्या न्यायालयातील निकालामुळे ती मुदत या संस्थांना लागू होत नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT