Gokul News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul : टोकन दिले तरी गोकुळचे ठरावधारक ऐकेनात... नेत्याकडे मुलाला नोकरी अन् लग्नही लावून देण्याची मागणी

Gokul Election, Milk Societies, Resolution Holders: गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठराव गोळा करण्यासाठी नेत्यांची धावपळ सुरू असून काही ठरावधारकांकडून नोकरी, लग्न आणि विविध सुविधांच्या मागण्यांमुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur: कोल्हापुर मधील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला गती आली आहे. जवळपास चार हजार पाचशे दूध संस्थांना ठरावाचा मसुदा पाठवण्यात आला असून ठराव जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांकडून ठराव गोळा करण्यासाठी लगबग सुरू आहे. मात्र ठराव देण्यासाठी वेगवेगळ्या अटींमुळे आणि मागणीमुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. इतकेच नव्हे तर टोकनच्या प्रस्तावासह ठरावधारकांनी नेत्यांसमोर ठेवलेल्या अटींमुळे आणि मागण्यांमुळे नेत्यांची कुचबंना झाली आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ठरावाला अधिक महत्त्व आहे. ज्याच्याकडे ठराव अधिक आहेत तो सत्तेतील भागीदार आहे. शिवाय महायुतीत देखील ज्याच्याकडे ठराव अधिक आहेत त्याला अधिकच्या जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या निवडणुकीत जवळपास साडेचार हजार पेक्षा अधिक संस्था सभासद निवडणुकीच्या मतदानाला पात्र ठरले आहेत. त्यामुळे प्रत्येक नेत्यांकडून आपापले ठराव गोळा करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. हे ठराव आपल्याकडेच येण्यासाठी अनेक आमिष ठराव धारकांना दाखवले जात आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात हे ठराव आपल्याकडेच यावे यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. इतकेच नव्हे तर अनेकांना लक्ष्मी लाभ देऊन पहिला टप्पा म्हणून ठराविक टोकन दिले आहे. ठराव आणि मतदान प्रक्रिया झाल्यानंतर दुसरा टप्पा देण्याची ग्वाही दिली आहे. मात्र या पलीकडेही जाऊन काही ठराव धारकांनी नेत्यांसमोर मुलाच्या लग्नाची अट ठेवली आहे. एक तर मुलाला नोकरी द्यावी, अन्यथा मुलांचे लग्न लावून द्यावी असे काही ठराव धारकांनी नेत्यांसमोर प्रस्ताव ठेवले आहेत.

काही संस्था सभासदांनी गोकुळमध्ये तरुणांना नोकरी द्यावी, याशिवाय संस्थेची इमारतीची डागडूजी करून द्यावी, संस्था नव्याने उभारून द्यावी. असे अनेक प्रस्ताव नेत्यांसमोर ठेवल्याची माहिती आहे. टोकन व्यतिरिक्त अन्य मागण्यामुळे नेत्यांची मात्र डोकेदुखी वाढली आहे.

ठरावासाठी नेत्यांमध्ये स्पर्धा

सर्वाधिक ठराव आपल्याकडेच यावेत यासाठी नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत फिल्डिंग लावली आहे. मतदार संघातील एक ही संस्था सभासद दुसऱ्या नेत्यांकडे जाऊ नये यासाठी खबरदारी घेतली आहे. त्या संस्था सभासदाला विविध आमिषं दाखवली जात आहेत. एक ठराव जवळपास लाखमोलाचा झाला आहे. त्यामुळे जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसं या ठरावांचा भाव आणखीन वाढणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT