Gokul Chairman Rajesh Patil Meeting Cm Fadnavis  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : कायदा बदलून 'गोकुळ'चे मिशन फत्ते..! आता अध्यक्षांसह 16 संचालक घेणार मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट

Maharashtra Politics: गोकुळच्या सत्तासंघर्षात कायद्यातील बदल आणि शासननियुक्त संचालकांच्या मतदानाच्या अधिकाराचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला होता. आता अध्यक्षपदाची निवड पूर्ण झाल्यानंतर महायुतीसमोर संघाचा कारभार आणि दूध उत्पादकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: गोकुळ दूध संघात सत्तास्थापनेसाठी महायुतीने आखलेले मिशन यशस्वी झाले. कायद्यात बदल करून शासननियुक्त चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात आल्यानंतर महायुतीला गोकुळमध्ये सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. आता संघाचे नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांच्यासह महायुतीचे 16 संचालक येत्या मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीत गोकुळच्या पुढील वाटचालीसह संघाच्या विकासाचा आराखडा मांडला जाण्याची शक्यता आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने 13 जागा जिंकल्या होत्या, तर महायुतीला 12 जागा मिळाल्या होत्या. पहिल्याच बैठकीला महायुतीचे संचालक अनुपस्थित राहिल्याने अध्यक्ष निवडीच्या वेळी गणपूर्तीचा पेच निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने गोकुळमध्ये चार शासननियुक्त तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यपालांच्या मंजुरीने संबंधित अध्यादेश जारी झाला आणि गोकुळमधील सत्तेचे गणित बदलले.

या निर्णयानंतर झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचे माजी आमदार राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे गोकुळच्या सत्तेची सूत्रे महायुतीकडे आली आहेत. आता नव्या संचालक मंडळाच्या माध्यमातून संघाच्या कारभाराला दिशा देण्याची तयारी सुरू झाली आहे.

अध्यक्षांसह 16 संचालक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

गोकुळचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्यासह महायुतीचे 16 संचालक येत्या मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीत गोकुळच्या विकासासाठी सरकारकडून अपेक्षित असलेले सहकार्य, संघाची पुढील वाटचाल आणि दूध उत्पादकांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

गोकुळसारख्या मोठ्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देणे, संघाचे कामकाज अधिक सक्षम करणे आणि बाजारपेठेतील विस्तार यांसारख्या विषयांवरही या भेटीत चर्चा होऊ शकते.

सत्तास्थापनेनंतर आता विकासाचा अजेंडा

गोकुळच्या सत्तासंघर्षात कायद्यातील बदल आणि शासननियुक्त संचालकांच्या मतदानाच्या अधिकाराचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला होता. आता अध्यक्षपदाची निवड पूर्ण झाल्यानंतर महायुतीसमोर संघाचा कारभार आणि दूध उत्पादकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत गोकुळच्या भविष्यातील विकासाचा अजेंडा निश्चित होतो का, याकडे कोल्हापूरच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT