<div class="paragraphs"><p>Gopichand Padalkar</p></div>

Gopichand Padalkar

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

असा होता हल्ल्याचा कट; व्हिडीओ टाकत पडळकरांनी घेतला मोठा निर्णय

सरकारनामा ब्युरो

सांगली : भाजपचे (BJP) नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मागील महिन्यात आपल्यावर झालेला हल्ला हा नियोजित कट असून त्यात जंयत पाटलांसह पोलीस अधिक्षक, उपअधिक्षकही सहभागी होते, असं पडळकर यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी बॉडीगार्ड न घेण्याचा निर्णयही घेतला असून पवार व पाटलांविरूध्दचा लढा सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पडळकर यांच्यावर आटपाडी येथे ता. 7 नोव्हेंबर रोजी कथित हल्ला झाला होता. याबाबतचा व्हिडीओ त्यांनी फेसबूकवर पोस्ट केला आहे. सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पडळकर यांनी थेट जयंत पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच व्हिडीओतील दृश्यांच्या आधारे त्यांनी हा हल्ला सुनियोजित असल्याचा दावा केला आहे. या कटात एस.पी. दिक्षित कुमार गेडाम, ॲडीशनल एस.पी मनिषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालक मंत्री जयंत पाटील पुर्णपणे सामिल होते, असं त्यांनी म्हटलं आहे.

पडळकर म्हणाले, हा हल्ला आटपाटी पोलीस ठाण्याच्या दारामध्ये झालेला आहे. आपल्याला दिसलेही असेल की हल्ला किती सुनियोजीत होता. माझी गाडी ज्या दिशेने येत होती. त्याच्या दुसऱ्या बाजूने दोनशे ते तिनशे लोकांचा जमाव लाठ्या-काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडं फेकायची मग गाडीचा वेग कमी होताच ट्रक अंगावर घालायचा... आणि मग जमावाकडनं हल्ला करवून घ्यायचा असा सुनियोजित कट आखण्यात आला होता.

आश्चर्याची बाब म्हणजे पोलीस या सर्व हल्ल्याचं चित्रीकरण करताना पाहायला मिळतात. हा सगळा कट पोलिसांच्या संरक्षणात घडवून आणला जातोय. या हल्ल्याच्या कटात जिल्हयाचे एस.पी. दिक्षित कुमार गेडाम, ॲडीशनल एस.पी. मनिषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालक मंत्री जयंत पाटील पुर्णपणे सामिल आहेत. यांनी या कारवाईच्या नावाखाली माझ्या बॅाडीगार्डलाच संस्पेंड केलं आणि उलट माझ्यावरच 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला, असा आरोपीही पडळकरांनी केला आहे.

एसपी आणि ॲडीशनल एसपी यांच्यावरचा विश्वास उडाल्यामुळं मी बॅाडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे, असं पडळकर यांनी स्पष्ट केलं आहे. कारण रक्षकच जर भक्षकात सामील असतील तर विश्वास ठेवायचा कुणावर, असा सवाल पडळकर यांनी केला आहे. पण मी माझा पवार-पाटलांविरूद्धचा लढा यापुढेही चालूच ठेवणार असल्याचेही पडळकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT