MLA Radhakrushn Vikhe Patil
MLA Radhakrushn Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'एसटी कामगारांना न्याय देण्याची भूमिका सरकारने घ्यावी'

Amit Awari

अहमदनगर : महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यावर राज्यातील राजकारण तापू लागले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या अडून भाजप व महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनीही आज महाविकास आघाडीला लक्ष्य करत आरोप केले. 'Government should take role to give justice to ST workers'

राधाकृष्ण विखे म्हणाले, राज्यात 40 हून अधिक कामगारांचे झालेले मृत्यू भयानक आहेत. सरकारला अजून किती कामगारांचे मृत्यू हवे आहेत? असा संतप्त सवाल माजी परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

ते पुढे म्हणाले, संप मोडण्याची भाषा करण्यापेक्षा कामगारांना न्याय देण्याची भूमिका सरकारने घ्यावी. मागील पंधरा दिवस एसटी कामगार संपूर्ण राज्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत असताना सरकारला मात्र त्यांच्याशी चर्चा करायला वेळ नाही. न्‍याय मिळत नसल्‍याने कामगार आता आत्‍महत्‍या करु लागले आहेत. दिवसागणिक ही संख्‍या वाढत चालली असतानाही संपाबाबत सरकार शुध्दीवर नसल्याचे दुर्दैव असल्याचे मत आमदार विखे पाटील यांनी व्यक्त केले.

ग्रामीण भागातील अर्थकारणाचा कणा म्हणून एसटीच्या सुविधेकडे पाहिले जाते. परंतु या कामगारांच्या प्रश्नाकडेच महाविकास आघाडी सरकारला पाहायला वेळ नसल्याची खंत व्यक्त करतानाच, एसटी कामगारांच्या श्रमातून महामंडळाचा डोलारा उभा राहिला आहे. हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विसरू नये. सरकारने कामगारांच्या प्रश्नाचा विषय जाणीवपूर्वक प्रतिष्ठेचा केला असल्याचा आरोप आमदार विखे यांनी केला.

कामगारांना न्याय देण्याऐवजी सरकारने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणे योग्य नाही. कामगारांचे निलंबन करणे हा उपाय नाही. त्यामुळे सरकारने एक पाऊल मागे येवून कामगारांच्या मागण्यांबाबत निर्णय करावा. विनाकारण संप मोडण्याची, तोडण्याची भाषा करण्यापेक्षा कामगारांच्या मागण्या मान्य करून न्याय देण्याची भूमिका राज्य सरकारने घेण्याची मागणी आमदार विखे पाटील यांनी केली.

राज्यात वाळू तस्करी नंतर आता गुटखा माफीयांनी डोके वर काढले असल्याकडे लक्ष वेधून, राज्यात गुटखा बंदी असताना बीडमध्ये 32 लाख रुपयांचा गुटखा आलाच कुठून ? मंत्र्यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे. मंत्र्यांचे नातेवाईक आणि बगलबच्चे या वाळू तस्करीत आहेत.

अवैध धंद्यांना सरकारचे एक प्रकार छुपे समर्थन मिळत असल्याने राजकारणातील गुन्हेगारीकरण वाढत चालले आहे. अवैध मार्गाच्या पैशातून निवडणुका लढवल्या जाणार असल्याचे भाष्‍य करुन, बीड मधील गुटखा रॅकेटमध्ये अनेकांचे हितसंबंध गुंतले असल्‍याची शक्यता व्‍यक्‍त करुन, या प्रकरणातील दोषींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी आमदार विखे पाटील यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT