सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादात सापडले आहेत. कोश्यारी हे आज सोलापुरात येणार असल्याने सर्वपक्षीय शिवप्रेमींनी त्यांची वाट अडविण्याचा निर्धार केला होता. यामुळे विमानतळ ते सोलापूर विद्यापीठ या मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.यामुळे राज्यपाल कार्यक्रमासाठी थेट हेलिकॉप्टरने सोलापूर विद्यापीठातील पोचले पण, जाताना ते अचानकपणे वाहनातून निघून गेले.
सोलापुरातील स्वामी विवेकानंद केंद्राचे उद्घाटन करुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कार्यक्रमाला जाणार होते. विद्यापीठातील कार्यक्रमासाठी ते वाहनातून जातील, असा अंदाज होता. राज्यपाल मात्र सोलापूर विमानतळावर गेले आणि तेथून हेलिकॉप्टरने विद्यापीठाजवळील सिंहगड अभियांत्रिकी कॉलेजमधील हेलिपॅडवर उतरले. तेथून ते थेट विद्यापीठात पोहचले. त्यांना नेण्यासाठी आलेल्या ताफ्याला काही जणांनी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर जाऊन काळे झेंडे दाखविले. कार्यक्रम आटोपल्यानंतर राज्यपाल तिथून थेट वाहनात बसून निघून गेले. त्यामुळे आंदोलकांना हुलकावणी देण्यात ते यशस्वी ठरले.
छत्रपती शिवरायांची (Chhatrapati Shivaji Maharaj) व महाराष्ट्राची राज्यपालांनी माफी मागावी, यासाठी शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. राज्यभरात कोश्यारींना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला जात आहेत. त्यांच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरही सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत राज्यपालांची वाट अडविण्याचे ठरले होते. विमानतळ, आसरा चौक आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी निदर्शनेही करण्यात येणार होती. यामुळे आज सकाळी नऊ वाजल्यापासून आंदोलक आसरा चौकात दबा धरून होते. त्याठिकाणी पाचशेहून अधिक पोलिसांचा (Police) बंदोबस्त होता. तरीही, काही ठिकाणी राज्यपालांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविण्यात आले.
विद्यापीठातील राज्यपालांचा कार्यक्रम केवळ पाच ते सात मिनिटांचाच होता. विद्यापीठातील मल्टीपर्पज हॉलच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर सभागृहातील भाषणात त्यांनी केंद्र सरकार व खेलो इंडियाचे कौतुक केले. सीएसआर फंडातून खेळाडूंसाठी नावीण्यपूर्ण गोष्टी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अनेक जिल्ह्यांत सीएसआर फंड पडून असल्याचा मुद्दाही त्यांनी अधोरेखित केला. या भाषणात त्यांनी राज्य सरकार व सरकारच्या कामगिरीबद्दल बोलणे टाळले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.