Lakhan Benade News : घरगुती भांडण झाल्यानंतर पत्नी प्रेयसी सोबत पळून गेल्याने रांगोळीचे ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे यांनी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर नवरा बायकोची इन्टाग्रामच्या रील च्या माध्यमातून एकमेकांना आव्हान देणे सुरू झाले. अखेर या प्रकरणाचा शेवट नवऱ्याच्या दोन तुकड्यांनी झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून बेनाडे बेपत्ता असून त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. अखेर लखन बेनाडे याचा अर्धवट जळालेला एक तुकडा संकेश्वर जवळील हिरण्यकेशी नदीत सापडून आल्याची माहिती आहे. संशयीत पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
रांगोळी ग्रामपंचायत सदस्य आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार लखन आण्णाप्पा बेनाडे (वय ३१, रा. माळभाग, रांगोळी, हातकणंगले) याचा कर्नाटकातील संकेश्वरजवळ खून झाल्याची घटना उघडकीस आली. लखनचा खून केल्याची कबुली काही संशयितांनी कोल्हापूर पोलिसांसमोर दिल्याची माहिती आहे. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्री घटनास्थळी गेले असून, त्याठिकाणी लखनच्या मृतदेहाचा शोध उशिरापर्यंत सुरू होता.
मिळालेल्या माहितीनुसार, लखन बेनाडे हा रांगोळी गावचा ग्रामपंचायत सदस्य असल्याने त्याचे गावात राजकीय वजन होते, परंतु गेले काही दिवस त्याचे पत्नीसोबत वाद सुरू होते. पत्नीसोबत समाज माध्यमावर या वादावर भाष्य केलेले अनेक व्हिडिओ व्हायरल केले होते. यामुळे दोघांतील ‘रिल्स वॉर’ चांगलेच भडकले होते. याप्रकरणी इचलकरंजी पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत. ९ जुलैला लखनची शेवटची ‘पोस्ट’ केली होती. यानंतर तो अचानक गायब झाला होता. दरम्यान, बेनाडे याचा आपण खून केल्याची कबुली देत काही संशयित कोल्हापूर पोलिसांत हजर झाले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने संकेश्र्वरकडे रवाना झाले.
लखन बेनाडे बेपत्ता झाल्याची तक्रार त्याची बहीण नीता उमाजी तडाखे (रा. आवळे गल्ली, इचलकरंजी) यांनी १० जुलै रोजी गावभाग पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर आज कर्नाटक राज्यात त्याचा खून झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. बेनाडे हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. काही स्थानिक राजकीय नेत्यांशी त्याचे संबंध होते. त्यामुळे तो सतत चर्चेत राहणारा व्यक्ती होता. बेनाडे याच्या हत्येमुळे स्थानिक राजकारणातही खळबळ उडाली आहे.
पत्नीसह नातेवाइकांनी मारहाण करून ४ लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केल्याची फिर्याद लखन बेनाडे याने १३ जूनला कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली होती. तीन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या पत्नीने आपल्याकडून वेळोवेळी ३ लाख ७० हजार रुपये घेतले होते. तिच्यासह नातेवाइकांनी मारहाण करून घरातील दागिनेही नेल्याचे फिर्यादीत म्हटले होते. याप्रकरणी लक्ष्मी बेनाडे हिच्यासह सात जणांविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रांगोळी येथील लखन बेनाडे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या वरिष्ठ स्तरावरील प्रमुख बड्या नेत्यांशी ओळख होती. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दिवंगत आर. आर. पाटील, विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ, आमदार रोहित पाटील आदी नेतेमंडळी बेनाडेस नावानिशी ओळखत होते. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या मर्जीतील कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे बेनाडे यांचा भागात रुबाब होता.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस (आय) पक्षाने २०१४ ची विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी हातकणंगले या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी ऐनवेळी लखन बेनाडे यांच्या गळ्यात पडली. त्यावेळी तत्कालीन आमदार सुजित मिणचेकर, त्यावेळचे अपक्ष उमेदवार माजी आमदार राजीव आवळे यांच्याशी त्यांची लढत झाली होती.
तर २०१६ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी रेंदाळ मतदारसंघातून तत्कालीन काँग्रेसचे उमेदवार राहुल आवाडे, भाजपचे महावीर गाट यांच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे लढविली होती. त्यात ते पराभूत झाले होते. दोन्ही निवडणुकात बेनाडे यांचे डिपॉझिट जप्त झाली होती, तर ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या रांगोळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.