Ajit Pawar, Shivendraraje Bhosale
Ajit Pawar, Shivendraraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शिवसागरमधील 'वॉटर स्पोर्ट'ला अजितदादांचा हिरवा कंदील; शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नांना यश

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : सातारा आणि जावली तालुक्यात कोयना 'बॅक वॉटर'मधील शिवसागर जलाशयात 'वॉटर स्पोर्ट' प्रकल्प सुरु करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रकल्पाची घोषणा केली. या निर्णयामुळे कास पठार आणि शिवसागर जलाशय परिसरातील पर्यटनवाढीस चालना मिळणार आहे. या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

कास पठार आणि बामणोली भागातील पर्यटन वाढीसाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. जावली तालुक्यातील कोयना बॅक वॉटर मधील शिवसागर जलाशयात वॉटर स्पोर्ट सुरु झाल्यास या भागातील पर्यटन वाढेल आणि त्यातून स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांना आर्थिक स्रोत निर्माण होऊन हा संपूर्ण भाग आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. त्यामुळे शिवसागर जलाशयात 'वॉटर स्पोर्ट' सुरु करण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रस्ताव सादर करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

यासंदर्भात पवार यांच्या दालनात महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे, शिवेंद्रसिंहराजे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत वॉटर स्पोर्ट सुरु करण्याबाबत विचारविनिमय होऊन श्री. पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात श्री. पवार यांनी या प्रकल्पाचा उल्लेख करून हा प्रकल्प सुरु करण्यास मान्यता दिली. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळवताना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. याबद्दल शिवेंद्रसिंहराजे यांनी शेखर सिंह यांचेही आभार मानले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT