Shiv Sainik Sanjay Bhosale
Shiv Sainik Sanjay Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शिंदेंच्या मनधरणीसाठी गुवाहाटीत गेलेल्या उपजिल्हाप्रमुखास पोलिसांनी घेतले ताब्यात

सरकारनामा ब्यूरो

दहिवडी (ता. माण) : कोणाच्या ध्यानीमनी नसताना शिवसेना (Shivsena) प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवरील श्रध्दा व शिवसेनेवरील नितांत प्रेमापोटी शिवसेनेचे साताऱ्याचे उपजिल्हाप्रमुख तथा कट्टर शिवसैनिक संजय भोसले हे थेट गुवाहाटीत पोहचले आहेत. त्यांनी हाॅटेल रॅडिसन ब्ल्यू येथे जावून बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना परत येण्याचं आवाहन केले आहे. गुवाहाटी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. (Guwahati police gave custdy Shiv Sena deputy district chief who visited Eknath Shinde)

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत अस्वस्थ निर्माण झाली असून महाविकास आघाडी सरकारही कोसळण्याच्या वाटेवर आहे. राज्यात एकनाथ शिंदेंवर टीका करणारे व त्यांचे समर्थन करणारे असे दोन गट निर्माण झाले आहेत. या सगळ्या गदारोळात शिंदे यांना परत आणण्यासाठी माण तालुक्यातील बिजवडी गावचे रहिवाशी व साताऱ्याचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले थेट गुवाहाटीत पोहोचले. एकनाथ शिंदे ज्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलात थांबले आहेत, त्याच हॉटेलबाहेर संजय भोसले पोहोचले असून 'साहेब मातोश्रीवर परत चला' अशी आर्त साद त्यांनी एकनाथ शिंदेंना घातली आहे.

संजय भोसले यांनी आपल्या गळ्यात एक पाटी लावली असून त्यांनी एकनाथ शिंदेंना भावनिक आवाहन केलं आहे. ‘शिवनसेना जिंदाबाद! एकनाथ शिंदे (भाई) मातोश्रीवर परत चला, उद्धवजी आणि आदित्यजींना साथ द्या’ असा मजकूर त्यावर लिहिलेला आहे. दरम्यान, हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या संजय भोसले यांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असून सर्वत्र संजय भोसले यांच्या नावाची चर्चा आहे.

कोण आहेत संजय भोसले?

बिजवडी (ता. माण) येथील संजय भोसले यांनी अतिशय तरुण वयात शिवसैनिक म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यानंतर शाखाप्रमुख, विभागप्रमुख, माण तालुकाप्रमुख व आता सातारा उपजिल्हाप्रमुख म्हणून ते काम पाहत आहेत. सडेतोड भूमिका घेवून कोणालाही शिंगावर घेण्याची त्यांची तयारी असते. आजचे त्यांचे आंदोलनसुद्धा असेच असून ते गुवाहाटीत गेल्याची साधी कुणकुणसुध्दा शिवसैनिकांना नव्हती. या आंदोलनामुळे संजय भोसले चर्चेत आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT