Eknath Shinde Hasan Mushrif And CPR Hospital Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Politics in the Mahayuti : मुश्रीफ आणि शिवसेनेच्या बड्या नेत्याचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; सीपीआरवरून मंत्री-आमदार आमनेसामने

Hasan Mushrif & Rajesh Kshirsagar in Mahayuti Government : राज्यात महायुतीचे सरकार आले असून काही निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केले होते. त्यावरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच नाराजी व्यक्त केली होती.

Aslam Shanedivan

Kolhapur News : महायुतीचे सरकार मोठ्या बहुमताने आले असून सर्व काही अलबेल असल्याचे तिन्ही पक्षांचे नेते म्हणत आहेत. पण मंत्र्यांच्या शपथविधी आणि आता पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर अनेक वाद समोर येत आहेत. दरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार तथा राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यातील मतभेद उघड झाले आहेत. यामुळे महायुतीत नक्की चाललंय तरी काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय?

नुकताच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सीपीआरमधील अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात येथील अतिक्रमण आणि यामुळे रूग्णांना होणारा त्रास याबाबत चर्चा झाली होती. यावरून मुश्रीफांनी सीपीआरचे डीन यांना आठ दिवसात अतिक्रण काढा किंवा स्वेच्छा निवृत्ती घ्या, असे खडेबोल अधिकाऱ्यांना सूनावले होते. यानंतर सीपीआर प्रशासनाने याआधी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आणि आदेशाचा वापर करत सीपीआरमधील अतिक्रमणांवर हातोडा चालवला.

दरम्यान काही वर्षांपूर्वी देखील सीपीआरमधील अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार होती. त्यावेळी काही अतिक्रमणधारक न्यायालयात गेले होते. त्यावेळी न्यायालयाने अतिक्रमणधारकांना एक महिन्याचा वेळ देत अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश देत एक महिना कारवाईला स्थगिती दिली होती. पण त्यानंतर हा विषय मागे पडला. पण आता कारवाईनंतर प्रकाश झोतात आला आहे. यामुळे कारवाईमुळे मुश्रीफ आणि क्षीरसागर यांच्यातील मतभेद ही चव्हाट्यावर आले आहेत.

कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय म्हणजेच सीपीआर रुग्णालयातील अतिक्रमण काढण्याचे आदेश मुश्रीफ यांनी दिले होते. त्याप्रमाणे 14 हून अधिक अतिक्रमण धारकांविरोधात कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. या मुद्द्यावरून नवा वाद सुरू झाला आहे.

क्षीरसागर यांचा इशारा

याच अतिक्रमण धारकांच्या समर्थनार्थ आमदार तथा राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्टँड घेतला आहे. त्यांनी मुश्रीफ यांचे आदेश बाजूला करत थेट प्रशासनाला जाब विचारला आहे. तर असला प्रकार खपवून घेणार नसल्याचाही इशाराही मनपा अधिकाऱ्यांना दिला. जिल्ह्यासह सीमाभागातील रुग्णांसाठी सीपीआर जीवनवाहिनी आहे. त्यामुळे येथे कोणताही गैरकारभार होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. पण फेरीवाल्यांवर अन्याय करणारा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही क्षीरसागर यांनी दिला आहे.

तसेच क्षीरसागर यांनी, सीपीआर परिसरात सन १९९५ पासून परवानाधारक फेरीवाले आहेत. हे गोरगरीब कुटुंबातील किरकोळ व्यवसाय करून आपला चरितार्थ गेल्या अनेक वर्षापासून चालवत आहेत. अतिक्रमणाला आम्ही पाठीशी घालणार नाही. पण आमचाविरोध अन्यायकारक कारवाई असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

अतिक्रमण कारवाई करण्याआधी त्यांचे नियमानुसार पुनर्वसन करणे गरजेचे असतानाही कारवाई केली जात आहे. प्रशासनाने अतिक्रमणविरोधी मोहीम अचानक हाती घेतल्यास फेरीवाले रस्त्यावर येतील. यामुळे पुन्हा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता ही क्षीरसागर यांनी वर्तवली आहे.

अजित पवार यांची नाराजी?

दरम्यान काहीच दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांच्या आदेशांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केले होते. यानंतर राष्ट्रवादीच्या बैठकीत या विषयावरून नाराजी व्यक्त झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हसन मुश्रीफ आणि मंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्णय परस्पर रद्द केले होते. यावरून सुरू झालेल्या वादावर अद्याप पडदा पडलेला नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उघड नाराजी व्यक्त केली. त्यांनी, आपल्या मंत्र्यांचे आदेश रद्द करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी किमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख म्हणून आपल्याशी चर्चा करायला हवी होती, असे म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT