Hasan Mushrif News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif News : मुश्रीफ चार वर्षांनी घालणार आंघोळ; अखेर थेट पाइपलाइनचा मुहूर्त ठरला!

Rahul Gadkar

Kolhapur Latest News : मागील अनेक काळापासून रखडलेल्या अन् कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा बनलेला थेट पाइपलाइन पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा दिवाळीत कोल्हापूरवासियांना अभ्यंगस्नान घालण्याची घोषणा केली. चार वर्षांपूर्वी मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या जनतेला दिवाळीतच अभ्यंगस्नान घालण्याची घोषणा केली होती. त्यानंतर टीकेचे धनी ठरलेले मंत्री मुश्रीफ यांना सातत्याने विरोधकांना तोंड द्यावे लागले होते. (Latest Marathi News)

आज अखेर थेट पाइपलाइनचे काम ९८ % पूर्ण झाले असून, दसऱ्यापर्यंत काळम्मावाडीचे पाणी कोल्हापूरनजीक असणाऱ्या पुईखडी पंपिंग हाऊसपर्यंत येईल, असे सांगितले. तर दिवाळीत पहिली अंघोळ थेट पाइपलाइनच्या पाण्याने करायचे असे सांगितले. मात्र गेल्या चार वर्षांपासून मंत्री मुश्रीफ हेच सांगत आल्याने यंदाच्या दिवाळीत पाणी मिळणार का? असा सवाल जनतेचा आहे. तर चार वर्षांनी का असेना कोल्हापूरकरांना या पाण्याने अंघोळ करायला मिळणार हे नक्की.

आघाडीच्या सत्तेच्या काळात तत्कालीन पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरला मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी काळम्मावाडीतून पाणी आणण्याची योजना आखली. त्याला जवळपास दहा वर्षे होत आले, तरी ही योजना पूर्णत्वास आली नाही. अद्यापही याचे काम सुरु आहे. सोमवारी पालकमंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत येऊन विविध कामाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी थेट पाइपलाइनच्या कामकाजाची परिस्थिती माध्यमांपुढे मांडली.

हे माझं भाग्य

पंचगंगा नदीचे पाणी प्रदूषित झाल्याने, ४५ किलोमीटर काळम्मावाडी(दूधगंगा) धरणातून थेट पाईपलाईन योजना राबवली. आघाडीच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी योजनेला मान्यता दिली होती. आज घडीला ही योजना अंतिम टप्प्यात आली आहे. विजया दशमीच्या दिवशी हे पाणी पुईखडीच्या ठिकाणी येईल. जवळपास ९८ % काम पूर्ण झाले असून टेस्टिंग देखील झाले आहे. पालकमंत्री असताना हे पाणी कोल्हापूरकरांना मिळतंय हे माझं भाग्य समजतो. यावेळी नव्या पाण्याने दिवाळीचे अभ्यंगस्नान करता येणार आहे. अशा शब्दात मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. सर्व आमदारांना या कार्यक्रमाला बोलवण्यात येईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

यापूर्वीही अनेक वेळा मुश्रीफांचा शब्द

युती सरकारच्या काळात थेट पाइपलाइन रखडली होती. २०१९ नंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थित तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी २०२० साली थेट पाइपलाइनच्या पाण्याने कोल्हापूरवासियांना अंघोळ घालीन, दीपावलीच्या पहिली अंघोळ (अभ्यंगस्नान) घालीन, असा शब्द दिला होता. मात्र, पाऊस आणि तांत्रिक गोष्टीमुळे थेट पाइपलाइनचे पूर्ण काम होऊ शकले नाही. महाविकास आघाडी त्याबाबत अयशस्वी ठरली. गेल्या जवळपास दहा वर्षांपासून वारसापासून हे काम रखडल्याने सातत्याने विरोधक पाटील आणि मुश्रीफ यांना कोंडीत पकडत होते.

थेट पाईपलाईनवरून भाजपचा रोष

मंत्री मुश्रीफ यांनी दिलेल्या आश्वासनावरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी रोष व्यक्त केला होता. तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील आणि मुश्रीफ यांनी या दिवाळीस अभ्यंगस्नान नाही घातले तर त्यांना पाच नद्यांचे पाणी आणून आम्ही अभ्यंगस्नान घालू, असा इशारा जून २०२१ ला दिला होता. मात्र सातत्याने येणारी अडचण आणि मोठा प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे थेट पाइपपलाइन पूर्ण करण्यास अडचण येत आहे. त्याबद्दल मुश्रीफ यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.

(Edited by - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT