NCP Merger News : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना का टार्गेट केले जात आहे? त्यांना व्हीलन का केले जातं आहे. विनाकारण त्यांना टार्गेट करू नका, आमच्या पक्षामध्ये कोणीही लुडबुड करू नका, असा टोला देत मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांना सल्ला दिला आहे.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, प्रफुल्ल पटेल हे पवार साहेबांच्या काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. आजही ते कार्याध्यक्ष आहेत. सुनेत्रा वहिनी यांना राष्ट्रीय अध्यक्ष केल्यानंतरही प्रफुल्ल पटेल हे कार्याध्यक्ष म्हणूनच राहणार आहेत. सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे आमदारांची मीटिंग बोलवण्याचा त्यांना अधिकार आहे. मग या दोघांना टार्गेट का केलं जातं आहे? त्यांना व्हीलन का केले जातंय? विनाकारण त्यांना टार्गेट करू नका आमच्या पक्षामध्ये कोणीही लुडबुड करू नका, असा टोला मंत्री त्यांनी विरोधकांना लगावला.
विलीनीकरणाबाबत अजितदादा एकटेच चर्चा करत होते. आमच्यापैकी कोणीही नेते त्याठिकाणी नव्हते. विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही, असा आमचा दावा नाही. पण अजितदादा गेल्यानंतर परिस्थिती बदललेली आहे. आम्हाला भारतीय जनता पक्षाला विश्वासात घ्यावं लागेल, त्यांचं मत काय आहे, हे पहावं लागेल. शिवाय सुनेत्रा वहिनी आणि कुटुंबाला काय वाटतं ते पक्षामध्ये होईल, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.
विलीनीकरणाच्या चर्चेमध्ये मी नव्हतो. मात्र त्यांच्याकडून सांगण्यात येतं की पवार साहेबांना थांबवायचं आणि अजितदादांनी नेतृत्व करायचं, असं ती मंडळी म्हणत आहेत. शशिकांत शिंदे बोलायचे. मात्र ती चर्चा जिल्हा परिषद निवडणुकीबाबत असायची. मात्र या विलीनीकरणाबाबत अजितदादा आमच्याशी काही बोलले नाहीत हे खरं आहे, असेही मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय स्टेडियमला अजितदादांचं नाव :
कोल्हापूरच्या विकासवाडीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान करण्याचं ठरलं आहे. त्याचा प्रस्ताव संभाजीराजे यांनी अजितदादांच्याकडे त्यावेळी दिला होता. एमआयडीसीची जमीन मैदानाला देण्याबाबतचा प्रस्ताव होता. आणि तो मंजूर झाला होता. अजित दादा यांनी मांडलेल्या चार ते पाच गोष्टींबाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घेऊन आदरांजली वाहिली. त्यामध्ये कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मैदानाला मंजुरी मिळाली आहे.
या मैदानाला स्वर्गीय अजितदादा यांचं नाव देण्याचा ठराव केला. याबद्दल जिल्हा नियोजन मंडळाचे मी आभार मानतो. आता या नावामध्ये बदल होणार नाही. इतर कोणी मागणी केली असेल तर ती नाव इतर कामांसाठी देऊ शकतो. अजून भरपूर काम आहेत. असेही स्टेडियमला विरोध करणाऱ्यांना मुश्रीफ यांनी ठणकवले.
राज्य शासन चौकशी करेल :
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितलं आहे की लोकांच्या मनातील शंका गेल्या पाहिजेत. जे आक्षेप घेतले आहेत त्याची सखोल चौकशी राज्य शासन करेल असे त्यांनी सांगितले आहे.
अजितदादांच्या अपघातामुळे जसं रोहित पवारांना दुःख झालं. त्याच्यापेक्षा जास्त दुःख आम्हाला झालं आहे. आमच्याही मनामध्ये शंका आहेत त्या मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या आहेत. त्यांचा पुतण्या म्हणून अजितदादांच्या अपघाताबद्दल रोहित पवारांची अस्वस्थता मी समजू शकतो. अशा शब्दात मंत्री हसन मुश्रीफ यांनी रोहीत पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.