Hasan mushrif
Hasan mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अध्यक्षपदाबाबत हसन मुश्रीफ म्हणाले की, मी मंत्री असल्यामुळे....

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅंकेसाठी (kdcc bank) झालेली निवडणूकही नुरा कुस्ती नसून निवडणूकच होती. मतदारांचा कौल मान्य करायचा असतो, अशा शब्दांत जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आज मत व्यक्त केले. जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार डॉ. विनय कोरे (vinay kore) यांनी केलेल्या टीकेवर त्यांनी हे मत व्यक्त केले असून तीन जागांवरील पराभवाचे विश्‍लेषणही केले जाईल. कोणत्या तालुक्यात कमी मते मिळाली याचा अभ्यास केला जाईल. त्यानंतरच यावर बोलले जाईल, असेही मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. (Hasan Mushrif said about the chairmanship of Kolhapur District Bank)

बॅंकेत सत्ताधाऱ्यांची सत्ता आली असली तरीही आमदार कोरे यांनी निवडणूक निकालानंतर नाराजी व्यक्त केली. प्रक्रिया गटातील दोघांचा विजय म्हणजे सत्तारूढ आणि विरोधी पॅनेलच्या नेत्यांता नुरा कुस्ती असल्याचा आरोप कोरे यांनी केला होता. याला आज मंत्री मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले. जिल्‍हा बॅंकेच्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीला यश मिळाल्याबद्दल त्यांनी नेते, सभासद, कार्यकर्ते यांचे आभार मानले. गेल्या सहा वर्षांत बॅंकेने उत्तुंग प्रगती केली आहे. हेच काम पुढे चालू ठेवले जाईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर आमदार कोरेच्या आरोपाचे खंडण करीत ही नुरा कुस्ती नसून ती निवडणूकच होती. मतदारांचा कौल मान्य करायचा असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आता तालुकानिहाय आकडेवारी मिळते. त्यामुळे कोठे किती मतदान झाले हे समजणे शक्य झाले आहे. यातून ज्या दोन जागांवर विरोधी पॅनेलचे उमेदवार विजयी झाले त्यांचे विश्‍लेषण केले जाईल. त्यानंतरच याबाबत भाष्य केले जाईल. काय झाले, कोठे झाले याचीही माहिती घेतली जाईल. दोन जागांवर झालेला पराभव धक्कादायक असल्याचे सांगून पराभवाने नाराजी येते, दुःख होते. त्यातून आरोप होतात. काय झाले हेसुद्धा पाहिले जाईल, मात्र हे ठरवून केलेले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. गट दोन आणि तीन मधील विचार केला तर गतवेळीसुद्धा पतसंस्था गटातील आमचा उमेदवार पराभूत झाला होता. तसेच मार्केटिंगच्या गटातील उमेदवारांना प्रचारासाठी वेळ कमी मिळाला. विरोधकांच्या उमेदवारांचा संपर्क अधिक होता, असेही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षपदासाठी कोणाचे नाव आहे, यावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘विजयी आणि पराभूत असे २१ उमेदवार एकत्रित बैठक घेऊन निवडणुकीबद्दल चर्चा होईल. अध्यक्षपद ठरविण्यासाठी विजयी अठरा जणांची बैठक होईल. तीत स्वीकृतसह अन्य निर्णय सर्वांनी मिळून घेतले जातील. मी मंत्री असल्यामुळे मला मंत्रालयात वेळे द्यावा लागतो. त्यामुळे अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडून कमी करावी, अशी आशा मी यापूर्वीच व्यक्त केली होती. त्यामुळे अध्यक्षपद आणि स्वीकृत संचालक हे सर्वांच्या बैठकीतच ठरविले जाईल,’’ तुम्ही अध्यक्षपद घेणार नाही काय ? या प्रश्‍नावर ते आत्ताच काही सांगता येणार नाही. सर्वांच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंडलिकांचे म्हणणे काहीच खोटे नाही

जे मागून मिळाले नाही ते निवडून मिळविले, अशी प्रतिक्रीया खासदार संजय मंडलिक यांनी दिली आहे. यावर प्रतिक्रीया विचारल्यावर यात त्यांचे काहीच खोटे नाही. तीन जागा त्यांनी मिळविल्यात हे मान्य करावे लागेल. जनतेचा कौल मान्य करावा लागतो, असेही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT