Hatkanangle Election Result 2024 : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. शिंदे गटाच्या धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील सरूडकर यांचा पराभव केला.
या पराभवानंतर शेट्टी मनातून तुटून गेले आहेत. "माझं काय चुकलं? प्रामाणिक असणं हा गुन्हा आहे का? शेतकऱ्यांनो तुम्हीही...", असा भावनिक सवाल शेट्टींनी ( Raju Shetti ) उपस्थित केला आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी दोनवेळा हातकणंगले मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. माजी खासदार निवेदिता माने आणि कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा पराभव करत ते खासदार बनले होते. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी यांना जवळ करत आघाडीतून निवडणूक लढवली आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसल्याच्या रोषाला शेट्टींना सामोरं जावं लागलं होतं. त्यापार्श्वभूमीवर शेट्टींनी यंदा स्वबळावर निवडणूक लढवली होती. पण, यंदाच्या निवडणुकीत शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर राहिले. शेट्टींना 1 लाख 79 हजार 850 मते मिळाली.
विद्यमान खासदार धैर्यशील माने, शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यातील या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मानेंसाठी राज्य पातळीवरून मोठी यंत्रणा कामाला लागली होती. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष घातलं होतं.
सत्यजित पाटील यांची उमेदवारी ऐनवेळी जाहीर झाली. तर राजू शेट्टी यांनी निवडणुकीच्या पूर्वीपासून मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचाराला सुरूवात केली होती. 2019 च्या निवडणुकीत राजकीय पक्षांशी सलगी केल्याचा फटका शेट्टींना बसला होता. त्यामुळे या निवडणुकीत दोन हात ते लांबच राहिले. संधी मिळेल तिथे पक्षांना लक्ष्यही केलं.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर ते महाविकास आघाडीत सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, महाविकास आघाडीला टाळी न देताच 'एकला चलो रे'ची भूमिका शेट्टींनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यांचा 'महायुती'ला विरोध होता तर त्यांनी किमान महाविकास आघाडीला बाहेरून का होईना पाठिंब्याची भूमिका घेतली असती तर चित्र वेगळे असते.
सत्यजित पाटील यांची उमेदवारी थांबली असती आणि दोघांमध्ये लढत झाली असती तर शेट्टींना नक्कीच फायदा झाला असता, अशी चर्चा रंगली आहे. पण, दोन धनाढ्य आणि बलाढ्य उमेदवारांच्या समोर राजू शेट्टी एकाकी पडल्याचं चित्र समोर आलं.
शेतकरी हा राजू शेट्टी यांचा आधार होता. आजपर्यंत शेतकरी केंद्रीत केलेल्या कामावर त्यांना साथ मिळेल, अशी अपेक्षा होती. आमदार बच्चू कडू यांनाही त्यांना साथ देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे कोणतेही स्टार प्रचारक नव्हते. फार आधीपासून प्रचाराला सुरूवात केल्यानं त्यांनी मतदारसंघातील गावागावत जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या.
सामान्य मतदार, शेतकरी यांच्या बळावर त्यांनी नशीब आजमावून पाहिले; पण, त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी "शेतकऱ्यांनो तुम्हीही...?" असा भावनिक सवाल उपस्थित केला आहे...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.