sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाक्का पाटील यांचे कराड येथे निधन

आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्यांनी पक्षाच्या माध्यमातून विविध चळवळीसाठी योगदान दिले.

सरकारनामा ब्यूरो

सांगली : शेतकरी कामगार पक्षाच्या लढवय्या नेत्या, स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिसिंह नाना पाटील (Krantisinha Nana Patil) यांच्या कन्या क्रांतीविरांगणा हौसाताई भगवानराव पाटील (Hausatai Patil) (वय ९४) यांचे आज (ता. २३ सप्टेंबर) सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रतिसरकार चळवळीच्या क्रांतीकारक नेत्या हरपल्या आहेत. त्यांच्या पश्‍चात मुले शेकापचे जिल्हा संघटक ॲड. सुभाष पाटील, प्रा. विलासराव पाटील, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. (Hausatai Patil passed away at Karad)

संपूर्ण महारष्ट्रात शेकाप परिवारात त्या हौसाक्का नावाने परिचित होत्या. आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्यांनी पक्षाच्या माध्यमातून विविध चळवळीसाठी योगदान दिले. हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे त्यांचे अखेरपर्यंत वास्तव्य राहिले. चार दिवसांपूर्वी त्यांना कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र कोरोना विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यामुळे कऱ्हाडमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राज्यभरातील पुरोगामी चळवळीत कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली.

हौसाताईंचा जन्म १२ फेब्रुवारी १९२७ रोजी येडेमच्छिंद्र (तालुका वाळवा) येथे झाला. वडील क्रांतीसिंह नाना पाटील यांनी स्वत:ला भारतीय स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिले असल्याने आणि आईचे छत्र लवकर हरपल्याने आजी गोजराबाई यांनी त्यांना देशप्रेमाचे बाळकडू पाजत मोठे केले. त्यांच्यामुळेच हौसक्कांच्या रक्तात महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ भिनलेली होती. पुढे पती भाई भगवानबाप्पा पाटील हेदेखील लढ्यात सक्रिय झाल्यानंतर हौसाताईंनी भूमिगत कार्यकर्त्यांचा राबता सांभाळला.

या काळात कार्यकर्ते व त्यांच्या कुटूंबियांमध्ये निरोपाची देवाण घेवाण करणे, प्रति सरकारच्या कालखंडात हत्यारांची ने-आण करणे, ती जपून लपवून ठेवणे, महत्वाच्या कार्यकर्त्यांकडे ती जबाबदारीने पोहच करणे. अशी धाडसी कामे त्यांनी पार पाडली. स्वातंत्र्यानंतरही त्या समाज व राजकारणात सक्रीय राहिल्या. १९५७ मध्ये संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा त्या भाग झाल्या. महागाई, दुष्काळी प्रश्न, अवैध वाळू उपसा, सिंचन योजना अशा विविध प्रश्नांवर त्यांनी आंदोलने केली.

क्रांतीकारक दुवा निखळला मुख्यमंत्र्यांची आदरांजली

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी हौसाक्का पाटील यांच्या निधनामुळे स्वातंत्र्य लढा ते आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीतील क्रांतिकारक दुवा निखळला आहे. त्यांचे जीवन क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याप्रमाणेच कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी वारसा ठरेल अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी वीरांगना हौसाक्का पाटील यांच्या निधनाबद्दल श्रध्दांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, स्वातंत्र्यलढा ते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि त्याही पुढे अनेक सामाजिक चळवळीत हौसाक्का पाटील यांनी कन्या म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे सिध्द केला. क्रांतिसिंहांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी तितक्याच आक्रमकतेने ब्रिटिशांना भंडावून सोडले होते. आधुनिक महाराष्ट्राच्या वाटचालीतही त्यांनी पुरोगामी विचार आणि वंचितांच्या हक्कांसाठी बाणेदारपणे आवाज उठवला. प्रसंगी संघर्षही केला. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या जडणघडणीतील एक महान क्रांतिकारक दुवा निखळला आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी वीरांगना हौसाक्का पाटील यांना विनम्र अभिवादन, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

स्वातंत्र्यसेनानी आदरणीय हौसाक्का पाटील यांच्या निधनाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, गोवामुक्ती संग्रामात, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अतुलनीय साहस दाखवणारा महान क्रांतीवीर हरपला आहे. महाराष्ट्राच्या स्त्रीशक्तीचे क्षात्रतेज काळाच्या पडद्याआड गेले आहे. वडील क्रांतिसिंह नाना पाटील यांचा कौटुंबिक, वैचारिक, राष्ट्रभक्तीचा वारसा समर्थपणे पुढे नेतांना महाराष्ट्राच्या पुरोगामी, सुधारणावादी, समतेच्या चळवळीला त्यांनी बळ दिले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्त्रोत, मार्गदर्शकाची भूमिका बजावली. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातही आधुनिक राष्ट्रनिर्मितीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचे निधन हा महाराष्ट्राच्या कृतीशील वैचारिक चळवळीला मोठा धक्का आहे. आदरणीय हौसाक्का पाटील यांच्या कार्याचा, विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वातंत्र्यसेनानी हौसाक्का पाटील यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT