पंढरपूर : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या पंढरपूर (Pandharpur) येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या (Vitthal Sugar Factory) निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) आणि कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांच्या गटाचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीमध्ये डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील (Abhijeet Patil) गटाने मोठा विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयामुळे विठ्ठल परिवाराच्या नेतेपदाचाही अभिजीत पाटील यांना बहुमान मिळाला आहे. (Historic victory of Abhijeet Patil group in the election of Vitthal Sugar factory)
कारखान्याच्या एकूण सहा ऊस उत्पादक गटातून सरासरी १३०० ते १४०० मतांची आघाडी घेत पाटील गटाने २० जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. भालके-काळे गटाला संस्था मतदार संघातील फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीतील या पराभवामुळे भगिरथ भालके यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. विधानसभा पोटनिवडणुकीपाठोपाठ आता विठ्ठल कारखाना निवडणुकीतही पराभव झाल्याने भालके गट अडचणीत आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांची कारखान्यावर गेल्या १८ वर्षापासून एकहाती सत्ता होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगीरथ भालके हे अध्यक्ष झाले होते. त्याच दरम्यान विठ्ठल कारखाना बंद राहिला होता. दुसरीकडे ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांचे वेतनही थकले होते. त्यामुळे सत्ताधारी भालके यांच्याविषयी नाराजी होती. सभासदांच्या नाराजीचाच त्यांना या निवडणुकीत फटका बसला आहे. अलिकडेच झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या भगिरथ भालके यांचा पराभव झाला होता. त्यानंतर विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीतही भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे यांच्या गटाचा दारुण पराभव झाला. भालके यांना एकापाठोपाठ दोन वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
विठ्ठल कारखान्याची मतमोजणी बुधवारी (ता. ६) सकाळी आठ वाजता येथील शासकीय धान्यगोदामामध्ये सुरू झाली. ती आज (ता. ७ जुलै) सकाळी पूर्ण झाली. दुपारपर्यंत फक्त भाळवणी गटाचीच मतमोजणी पूर्ण झाली. त्यामध्ये अभिजीत पाटील गटाला ५०० हून अधिक मतांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर करकंब गटातूनही पाटील गटाने आघाडी घेतली. सायंकाळी मेंढापूर आणि तुंगत गटाची मतमोजणी सुरु झाली. त्यामध्ये युवराज पाटील गटाला सुरवातीला काही गावांमध्ये आघाडी मिळाली. त्यानंतर सरकोली, कासेगाव या दोन्ही गटात अभिजीत पाटील यांना निर्णायक मतांची आघाडी मिळाली. मतमोजणी अखेर आज (ता.७) सकाळी 9 वाजता पूर्ण झाली. तब्बल २४ तासांपेक्षा अधिक काळ मतमोजणीसाठी लागला. मतमोजणीनंतर निकाल जाहीर होताच, अभिजीत पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळून व फटाक्यांची आषबाजी करत जल्लोष केला.
कार्यकर्त्यांनी अभिजीत पाटील यांची स्टेशन रोडवरुन टेेम्पोतून सवाद्य मिरवणूक काढली. मिरवणुकीनंतर अभिजीत पाटील व निवडून आलेल्या सर्व संचालकांनी विठुरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर थेट विठ्ठल कारखान्यावरील संस्थापक (कै.) औदुंबर पाटील व यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.
ग्रामीण भागातही जल्लोष
विठ्ठल कारखाना निवडणुकीमध्ये अभिजीत पाटील गटाने बाजी मारल्यानंतर तालुक्यातील प्रत्येक गावात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळून करत मोठा जल्लोष केला. अनेक ठिकाणी नूतन संचालकांच्या मिरवणुका काढल्या, तर काही ठिकाणी साखर व पेढे वाटून आनंद साजरा केला.
अभिजीत पाटलांना सर्वाधिक मते
विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये अभिजीत पाटील यांनी सत्ताधारी भालके -काळे गटाला धोबीपछाड करत विजय मिळवला आहे. कारखान्याच्या २१ पैकी २० जागांवर त्यांचे उमेदवार मोठ्या मतांनी विजय झाले आहेत. निवडून आलेल्या २० उमेदवारांमध्ये अभिजीत पाटील यांना सर्वाधिक ८ हजार ७४६ मते मिळाली आहेत.
भालके -काळे गट तिसऱ्या क्रमांकावर
विठ्ठल साखर कारखाना निवडणुकीमध्ये सत्ताधारी भालके -काळे गटाचा दारुण पराभव झाला आहे. निवडणुकीमध्ये अभिजीत पाटील, युवराज पाटील आणि भालके-काळे असे तीन पॅनेल आमने सामने होते. तिन्ही गटांनी विजयाचा दावा केला होता. तथापी निवडणुकीमध्ये दुसर्या आणि तिसर्या स्थानावर कोणता पॅनेल जाणार याचीही चर्चा सुरु होती. निकालामध्ये सत्ताधारी भालके - काळे गट तिसर्या क्रमांवर राहिला आहे. तर युवराज पाटील गटाला दुसर्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
निवडणुकीमध्ये २ हजार ४४२ मते बाद
विठ्ठल साठी चुरशीने झालेल्या निवडणुकीमध्ये तब्बल २ हजार 442 मते बाद झाली आहेत. एकूण 25 हजार 361 मतदारांपैकी 22 हजार 841 मतदारांनी मतदान केले होते. मतदान केलेल्या मतदारांपैकी तब्बल 2 हजार 442 मतदारांची मते बाद झाली आहेत. बाद झालेली मत नेमकी कोणत्या गटाची या विषयी आता चर्चा सुरु झाली आहे.
गटनिहाय बाद झालेली मते
भाळवणी (374)
करकंब (361)
मेंढापूर (382)
तुंगत (476)
सरकोली (481)
कासेगाव (368)
गटनिहाय उमेदवारांना मिळालेली मते
1) भाळवणी गट
मोहन नामदेव बागल (6942),रुक्मिणी पांडुरंग बागल (6627),विलास विष्णू देठे(6485), मधुकर शामराव गिड्डे (6962),धनंजय उत्तम काळे(8327).अरविंद धर्मा लोकरे(14), मोहन शामराव लोकरे(20),साहेबराव श्रीरंग नागणे(8315), कालिदास रधुनाथ पाटील(8165). दिपक दामोदर पवार (7008), बाळासाहेब विष्णू यलमर(6260)
2) करकंब गट
मारुती श्रीमत भिंगारे (6681),जिवराज वसंत चव्हाण(55), रामकृष्ण नारायण जवळेकर(7010), दशरथ पंढरीनाथ खळगे(6412),शहाजी माणिक मुळे(6666),नवनाथ अंकुश नाईकनवरे(8500),दत्तात्रय विश्वनाथ नरसाळे(7930), हणमंत ज्ञानोबा पवार(6528), सिद्राम देविदास पवार(68880),कालिदास शंकर साळुंखे(7877)
3) मेंढापूर गट
जनक माणिक भोसले (8301) विलास अभिमन्यू भोसले(6646),तानाजी भिमराव भुसनर(6630),दिनकर अदिनाथ चव्हाण(8040),बळीराम यशवंत पाटील(7171),युवराज विलास पाटील(7221)
4) तुंगट गट
गणेश कृष्णा चव्हाण(6741),धनाजी लक्ष्मण घाडगे(6519),महेश मोहन कोळेकर(6290), प्रविण विक्रम कोळेकर(8442),अभिजीत धनंजय पाटील(8746), विक्रांत चंद्रकांत पाटील(6893)कुंडलिक रंगनाथ पवार(8), रामहरी अनंत रणदिवे(15)
5) सरकोली गट
भगिरथ भारत भालके (7051), निवास कृष्णा भोसले(27), प्रविण रामचंद्र भोसले(7019), संभाजी ज्ञानोबा भोसले( 8441), अंकुश गजेंद्र शिंदे(9) बबन रंगनाथ शिंदे (6762),नयना अशोक शिंदे(6450),सचिन सोपान वाघाटे(7875)
6) कासेगाव गट
बाळासाहेब दगडू आसबे(6650),सुरेश बाबा भुसे(8528),प्रशांत बाळासाहेब देशमुख(7039), विजयसिंह बाळासाहेब देशमुख(6223) बाळासाहेब चिंतमणी हाके(8255),गोकूळ दिगांबर जाधव(6313), माणिक विश्वनाथ जाधव(6810),हेमंतकुमार प्रकाश पाटील(6769), प्रेमलता बब्रुवान रोंगे (8162)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.