Gopichand Padlkar-Dilip Walse Patil

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

‘गोपीचंद पडळकरांच्या इशाऱ्यावरून जानकरांच्या अंगावर गाडी घातली....’

गोपीचंद पडळकरांवरील हल्ल्याबाबतच्या प्रश्नावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिले उत्तर

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर ३०७ चा गुन्हा का दाखल झाला, याचे उत्तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आज (ता. २८ डिसेंबर) विधानसभेत दिले. राजू जानकर यांच्यावर पडळकर यांच्या इशाऱ्यावरून गाडी घालण्याचा प्रयत्न झाला, असा दावा गृहमंत्र्यांनी उत्तरात केला. यात राजू जानकर यांचा पाय मोडल्याने आमदार पडळकर यांच्यावर ३०७ चा गुन्हा दाखल झाला, असे वळसे पाटील यांनी सांगितले. (Home Minister Dilip Walse Patil replied to question regarding attack on Gopichand Padalkar)

सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर ७ नोव्हेंबर रोजी हल्ला झाला होता. त्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. त्याला गृहमंत्री वळसे पाटील यांनी आज उत्तर दिले.

गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, ब्रह्मानंद पडळकर हे आमदार पडळकर यांचे बंधू आहेत. त्यांनी काही लोकांसोबत मारहाण केली होती. आमदार पडळकर यांच्यावर एकूण 15 गुन्हे दाखल आहेत, तर त्यांच्या भावावर म्हणजे ब्रह्मानंद पडळकर यांच्यावर 10 गुन्हे दाखल आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही पडळकर यांच्यावरही गुन्हे दाखल झालेले आहेत.

आमदार पडळकर यांच्या संरक्षणासाठी मी सांगली पोलिसांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत, अशी ग्वाही देत ‘पडळकर यांना मला काही कमी दाखवयाचे नाही. पण, आपण समाजात वागत असताना एक पथ्य पाळले पाहिजे तसेच, भानही राखले पाहिजे. ते नाही ठेवले तर अशा प्रसंगाला, प्रश्नाला सामोरे जावे लागते,’ अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पडळकरांचे अप्रत्यक्ष कानही टोचले.

दरम्यान, या चर्चेवेळी समाधान न झाल्याने देवेंद्र फडणवीस यांनी काही मुद्दे उपस्थित केले. पोलिस ठाण्यासमोर सात टिप्पर आले होते. त्या टिप्परमध्ये दगडगोटे आणि सोडा बॉटल होत्या. त्यावर वळसे पाटील म्हणाले की, पोलिसांच्या माहितीनुसार दगड व सोडा बॉटल नव्हत्या. पण, स्टेशन डायरीत नोंद कशी आली, यासाठी मी स्टेशन डायरी आणि त्या प्रकरणाची व्हिडीओ क्लिप आणि या प्रकरणाचा सविस्तर अहवालही मागविला आहे. त्यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर आटपाडी येथे ता. 7 नोव्हेंबर रोजी कथित हल्ला झाला होता. याबाबतचा व्हिडीओ त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला होता. सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये पडळकर यांनी थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते.तसेच व्हिडीओतील दृश्यांच्या आधारे त्यांनी हा हल्ला सुनियोजित असल्याचा दावाही केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT