राज्य परिवहन महामंडळ (एसटी)
राज्य परिवहन महामंडळ (एसटी) सरकारनामा
पश्चिम महाराष्ट्र

आजचे किती नेते एसटीत बसतात?

प्रकाश पाटील

अहमदनगर : मागील काही दिवसांपासून एसटीचा संप सुरू आहे. बेचाळीस कर्मचाऱ्यांनी न्यायासाठी जीवन संपविले. दु:ख वाटले. आयुष्याची वीस-पंचवीस वर्षे नोकरी करूनही हातात पंचवीस हजारांच्या पुढे पगार येत नाही. हे चित्र गेल्या पाच दशकांहून अधिक काळ दिसते आहे. गावागावांत एसटीचे जाळे असल्याचे आपण मोठ्या अभिमानाने सांगत असलो, तरी ती गावागावांत ती पोचविण्याचे जे कष्ट घेतले जातात, त्यामागे चालक- वाहक असतात. इतर सरकारी नोकर आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांची तुलना केली, तर सर्वच बाबतींत मोठी तफावत दिसून येते. How many leaders sit in the S.T. today?

अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कर्मचाऱ्यांनी वज्रमूठ केलीय. त्याचे स्वागतच केले पाहिजे. आता त्यांना चांगली पगारवाढ ठाकरे सरकारने देऊ केलीय. त्याबद्दल सरकारचेही अभिनंदन! कर्मचाऱ्यांच्या आणखी काही मागण्या आहेत. त्याबाबत जो काही निर्णय व्हायचा आहे, तो होईलच. मात्र, चालक- वाहक हा एसटीचा कणा आहे. पन्नास- पंचावन्न प्रवाशांच्या जिवाचे रक्षण करीत चालक प्रत्येक संकटाला प्रत्येक क्षणी तोंड देत कर्तव्य बजावत असतो, हेही तितकंच खरं. असो!

हे सर्व सांगण्याचं कारण असं, की भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी नुकत्याच अनौपचारिक गप्पा झाल्या. त्यात एसटीचा विषय निघाला. त्यांनी प्रवासाच्या आठवणी जागविल्या. ते म्हणाले, ‘‘मी कोल्हापूरला शिकायला असताना एसटीने प्रवास करायचो. जाताना आणि येतानाही. कोल्हापूरहून बाभळेश्वरला आलो, की तेथून घरी यायचो. संपूर्ण शिक्षण घेईपर्यंत प्रवासाला एसटीच असायची. एसटीचा प्रवास सुरक्षित आहे, हे आम्हाला घरातून सांगितले जायचे.’’

विखे पाटील साहेबांसारखे जे कोणी ज्येष्ठ नेते असतील, त्यांनी एके काळी एसटीनेच प्रवास केलाय. श्रीमंत आणि गरिबांसाठी एसटीच होती. येथे दुसरी आठवण झाली ती म्हणजे शेकापचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख साहेबांची. ते तर नेहमीच एसटीने प्रवास करायचे. नागपुरातील अधिवेशनाला जाताना ते एसटीने गेले होते. बसमधून उतरतानाचा त्यांचा फोटो आजही मनात घर करून राहिलाय. या फोटोवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर साहेबांनी ‘हॅट्स ऑफ आबासाहेब’ अशी पोस्ट व्हायरल करून त्यांच्या साधेपणाला सलाम केला होता. एसटी हा प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात बरेच आरोप-प्रत्यारोप झाले. एका युवा आमदाराने परिवहनमंत्र्यांवर आरोप केला. तोही एकेरी शब्दात. अनिल परब मंत्री आहेत, याचे भान त्यांना राहिले नाही. हल्ली अरे-तुरेची भाषा वापरणे भूषण समजले जाते. खरं तर आजचे जे नेते आहेत, त्यांपैकी किती जण एसटीने प्रवास करतात, हा संशोधनाचा विषय. मंत्री परब यांनी एक तास एसटी चालकाच्या सीटवर बसून दाखवावे, असे आव्हान दिले गेले. परब चालकाच्या सीटवर बसतील की नाही हे माहीत नाही; परंतु आजचे किती नेते एसटीत बसले आहेत, याचेही उत्तर हवे आहे. नेत्यांकडे पन्नास लाखांपासून कोटीपर्यंतच्या अत्याधुनिक कार आहेत. आरामदायी प्रवास असतो त्यांचा. ते कशाला एसटीने प्रवास करतील, हेही खरंच! जगाची गती वाढल्याने आता नेत्यांनी एसटीने प्रवास करणेही शक्य नाही. पण, अनुभव म्हणून एसटीचे चालक-वाहक कर्तव्य कसे बजावतात, त्यांची रेस्ट रूम कशी आहे, हे कधी तरी डोकावून पाहणार आहात की नाही? नेत्यांनी एसटीने प्रवास करावा अशी अपेक्षा मुळीच नाही. पण, मंत्री परब यांच्यासह लोकप्रतिनिधींनी एसटी प्रवासाचा अनुभव घ्यायला काय हरकत आहे?

एक काळ असा होता, की प्रवासासाठी एसटी हेच एकमेव साधन होते. तशी परिस्थिती आज राहिली नाही. जग बदललं. स्पर्धा वाढली. खासगी वाहतूक आली. ‘व्होल्व्हो’सारख्या गाड्या आल्या. घरासमोर कार आली. तरीही आज अनेक जण एसटीच्या प्रवासाला प्राधान्य देतात. त्यांना ती सुरक्षित वाटते. याचे श्रेय एसटी चालक- वाहकांना द्यायला हवे. काहीही असो, एसटी माझी आहे, आपली आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, असे अकरा कोटी जनतेला वाटते, यातच सर्व काही आले!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT