पंढरपूर : प्राप्तीकर (income tax) विभागाचा छापा पडूनही मी लोकांच्या सतत संपर्कात आहे. मी कधीच नाॅट रिचेबल नव्हतो आणि पुढेही कधी राहणार नाही. दुसऱ्या नेत्यासारखा तोंड लपवून दोन दोन वर्षे घरात रडत बसणाऱ्यांपैकी मी नाही, असा टोला विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांनी माजी अध्यक्ष भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचे नाव न घेता लगावला. (I am still reachable despite income tax's raids : Abhijit Patil criticizes Bhagirath Bhalke)
पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अभिजीत पाटील यांनी बाजी मारल्यानंतर त्यांचे खासगी साखर कारखाने आणि कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने छापा टाकली होता. यामध्ये १ कोटी १२ लाख रुपये सापडल्याची चर्चा होती. त्यावर भालके गटाच्या समर्थकांनी अभिजीत पाटील यांना सोशल मीडियातून ट्रोल करण्यात आले होते. त्यावर अभिजीत पाटील यांनी भगीरथ भालके यांचे नाव न घेता, मी घरात रडत बसणारा कार्यकर्ता नाही, आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देणारा कार्यकर्ता आहे. दुसऱ्या नेत्यासारखा मी नाॅट रिचेबल नव्हतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
याविषयी अभिजीत पाटील म्हणाले की, मागील दोन वर्षांपासून विठ्ठल कारखान्या सभासदांचे सुमारे ३० कोटी रुपयांचे ऊसबिल थकीत होते. निवडणुकीपूर्वी थकीत ऊसबिल देऊनच उसाची मोळी टाकणार, असे सभासदांना आश्वासन दिले होते. सभासदांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून कारखान्याची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. थकीत ऊस बिल देण्यासाठी माझ्या खासगी साखर कारखान्यावर कर्ज काढले आहे. अशा वेळी माझे खासगी साखर कारखाने आणि कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने छापे टाकून तपासणी केली. तपासणीत १ कोटी १२ लाख रुपये सापडले. ती रक्कमही आम्हाला परत मिळाली आहे. सभासदांना सणाच्या निमित्ताने विक्री केलेल्या साखरेच्या १५ कोटी रुपयांची माहितीही प्राप्तीकर विभागाला दिली आहे. वाळू ठेका घेताना १४ कोटी रुपये कर्ज घेतले होते, तेही आम्ही व्याजासह भरलेले आहे. सगळे पुरावे दाखल केले आहेत.
विठ्ठल साखर कारखाना सुरु होतोय, सभासदांचे पैसे मिळू लागले आहेत. त्यामुळे विरोधकांचा पोटसूळ सुरु झाला आहे. लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम सुरु आहे. कितीही अफवा पसरवल्या तरी आम्ही येत्या हंगामात सभासदांना २ हजार ५०० रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे. तो आम्ही देणार आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून कारखान्याचा गाळप हंगाम सुरु केला जाणार आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.