Solapur, 06 October : अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी घेतली जात असेल तर त्या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी मी बोलेन. परीक्षा फी घ्यायची नाही, अशी विनंती आणि सूचना कुलगुरू यांना केली आहे. दंड वगैरे लावत असतील, तर हे बरोबर नाही. मी चंद्रकांतदादांच्या कानावर ही गोष्ट घालेन आणि सरकारने दुष्काळी विद्यार्थ्यांना न्याय दिला असतानाही कोणी फी मागत असेल तर कारवाई केली जाईल, असा इशाराही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला.
अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या कार्यक्रमात उद्योग मंत्री सामंत बोलत होते. दुष्काळामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफी केलेली आहे. मात्र, अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात परीक्षा फी घेतली जात आहे, त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे.
दुष्काळाचं भान आम्हाला आहे..
सांस्कृतिक कार्यक्रमावर विद्यापीठाने खर्च केलेलं नाही. हा मराठीच्या अभिमानाचा कार्यक्रम आहे. दुष्काळमुळेच बुकेदेखील स्वीकारला नाही, त्याचे भान आम्हाला आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी झालो आहोत. हा विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमचं नातं दुष्काळाशी जोडू नये. एखादे विद्यापीठ मराठी भाषेचे कार्यक्रम करतं असेल तर मंत्री म्हणून जाने माझे कर्तव्य आहे.
ते म्हणाले, अभिजात भाषा झाल्यानंतर उत्कृष्टता केंद्र मंजूर करावं लागतं. 2011 च्या पूर्वी अभिजात भाषेचा ज्याला दर्जा मिळालेला आहे, त्यांचे केंद्र बारा बारा वर्षे मंजूर झाले नाही. दोन महिन्यांपूर्वी डेक्कन युनिव्हर्सिटीमध्ये सर्वोत्कृष्टता केंद्र मंजूर झालं. अहवालानंतर केंद्राला निधी मंजूर होणार आहे.
ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या खुनाप्रकरणी अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपाला चोख प्रतिउत्तर दिलं आहे. दानवे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. एकनाथ शिंदे यांना देश आणि महाराष्ट्र ओळखतो, असा टोला त्यांनी दानवेंना लगावला.
भाजपने घात केला, असं वाटत नाही
विधान परिषद निवडणुकीतील महायुतीच्या जागा वाटपावर उद्योग मंत्री सामंत म्हणाले, पाचपैकी चार जागांवर एकमत झालं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही आज कामात व्यस्त होते, त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघासाठी दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरून ठेवले आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस योग्य तो निर्णय घेतील.
पुणे मतदारसंघात भाजपने घात केला, असं वाटत नाही. अमरावतीत आमच्या उमेदवाराला भाजपचा पाठिंबा आहे. नागपूरला आमचा त्यांना पाठिंबा आहे. राष्ट्रवादीलाही दोन्ही पक्षांचा पाठिंबा आहे. पुणे मतदारसंघाबाबत दोन्ही नेते चर्चा करतील आणि निर्णय घेतील, असेही सामंत यांनी म्हटले आहे.
राहुल गांधींना ब्रेकिंगमध्ये राहायची सवय
उद्योगमंत्री म्हणाले, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे ताब्यात घेण्यासाठीच असे उपक्रम करत असतात, त्यामुळेच प्रसिद्धी आणि ब्रेकिंग तुम्ही त्यांना देता. सतत ब्रेकिंगमध्ये राहिलं पाहिजे यासाठी ते उपद्वाप करत असतील. ते तीन तास बाहेर बसले म्हणून बातमी झाली, तेच तीन मिनिटे बसले असते तर बातमी झाली असती का? बातमी होणं हे दिल्लीतून सुरू आहे, त्यामुळे मतदार मनावर घेत नाहीत, आम्हीही मनावर घेत नाही, तुम्हीही मनावर घेऊ नका. भविष्यातील थोडीफार मतं वाढावी, त्यासाठी त्यांनी हे आंदोलन केलं आहे.
ते मोठे लोक आहेत
अभिजित दिपकेंच्या MPSC आंदोलनाबाबत ते म्हणाले, महाराष्ट्राचा संस्कार जगाने बघितला आहे. इंग्रजांचे राज्य होतं, तेव्हा जगाने पाहिलंय की महाराष्ट्र काय करू शकतो. इथल्या नेत्यांनी देश एक ठेवला आहे, तोच इतिहास जर आपण कॅरी फॉरवर्ड केला, तर असं वक्तव्य होणार नाही. ते (अभिजित दिपके) मोठे लोक आहेत, ते चूक की बरोबर हे महाराष्ट्र ठरवेल.
विवेकानंद पाटील आणि विद्यानंद बापटाबाबत उदय सामंत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, विवेकानंदचं कौतुक मी आज केलंय. मात्र, बापटांचं कौतुक मी 2014 मध्ये केलं आहे, ते माझ्या तालुक्यातील आहेत. माझ्या मतदारसंघातील घोळप हे त्यांच गाव आहे, त्यावेळी ते आदर्श म्हणून सापडले होते, तेव्हा मी त्यांचा सत्कार केला होता; म्हणून आता ते असं बोलतायत. विवेकानंद हा चांगला आहे तर आहेच. पण त्याच्या भाषणाचा उपयोग इतरांना होतोय. या दोघांनाही ब्रँड अँबेसिडर करू आणि जिल्हानिहाय करू.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.