Rajendra Raut-Dilip Sopal
Rajendra Raut-Dilip Sopal  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

दिलीप सोपलांची ईडी चौकशी लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही : राजेंद्र राऊतांचा इशारा

विश्वभूषण लिमये

सोलापूर : ‘आर्यन शुगर्स’शी तुमचा संबंध नाही, तर कोणाचा आहे? वयाचा विचार करून मी मान-सन्मान ठेवत होतो. पण, एवढीच मग्रुरी असेल तर इकडे ईडी, इन्कम टॅक्स आहे. कोणं कुठं जाऊन बसायला लागले आहेत, हे त्यांनाही माहिती आहे. त्यांचेच काही दोस्त जेलमध्ये जाऊन बसले आहेत. ‘आर्यन शुगर’च्या बाबत सोलापूर (Solapur) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (DCC Bank) माध्यमातून कसा गैरव्यवहार झाला, याबाबची तक्रारी पांगरी आणि सोलापूर शहर पोलिसांत दिली आहे. तसेच, आर्यन शुगरबाबतची तक्रार पुढच्या आठवड्यात मी स्वतः सक्तवसुली संचनालय (ईडी ED) कार्यालयात देणार आहे. ईडीची चौकशी लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांना दिला आहे. (I Will complain to ED against Dilip Sopal : Rajendra Raut)

बार्शीचे माजी आमदार आणि माजी मंत्री दिलीप सोपल हे सोलापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे संचालक असताना ‘आर्यन शुगर्स’ या साखर कारखान्याला कर्ज दिले होते. साखर कारखाना बुडीत निघाल्यावर त्यांनी हात वर केले आहेत. आर्यन शुगर कारखान्यामधील कामगार, ज्या शेतकऱ्यांचा ऊस गाळप केला आहे, त्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत, त्यामुळे याबाबतची तक्रार लवकरच ईडी कार्यालयात करणार आहे, असे आमदार राऊत यांनी स्पष्ट केले.

आमदार राऊत म्हणाले की, आम्ही काय कोणाला बुडवाबुडवीच्या भानगडीत नाही. पण, त्यांनी (दिलीप सोपल) भाषा काय वापरली, आर्यन शुगर्स माझा काही संबंध नाही. मग संबंध कोणाचा आहे. आम्हाला लिहून द्यायला बॅंकेचे अधिकारी काय वेडे आहेत का? याबाबतचा विषय सध्या न्यायालयात आहे. लोकप्रतिनिधी असताना ह्यांनी बार्शी तालुक्याचा विकास केलेला नाही. कोणतेही विकासाचे काम आणले तर त्यात अडथळे आणण्याचे काम त्यांनी केले आहे. एवढं करूनही लोकांचं पैसे बुडवायचे आणि दुसऱ्यांच्या नावाने बोंबा मारायच्या, हे या पुढे चालणार नाही.

शेतकऱ्यांचा आणि सोलापूर जिल्हा बॅंकेचा एक ना एक रुपये वसूल केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. माणसुकीच्या नात्यातून मी एवढं दिवस सहन करत होतो. पण, त्यांना वाटतंय मी गप्पच बसतोय. काय त्यांची भाषा, काय पद्धत. कोण उजवं आणि कोण डावं. कोणाला टोप्या घालणारे आहेत. कुठून आले ५०-५० कोटी रुपये? असले चोर, लफंगे, लोकांना लुटणारी माणसं जवळ करायची आणि आम्हाला एकेरी भाषा वापरायची असेल तर त्यांच्यापेक्षा शंभर पट बोलू शकतो, असा इशाराही आमदार राऊत यांनी सोपलांना दिला.

माजी मंत्री दिलीप सोपल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. मात्र, मागच्या विधानसभा निवडणुकीत दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीत त्यांना अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला होता. आता याच राजेंद्र राऊतांनी भाजपच सहयोगी सदस्यत्व स्वीकारलं आहे आणि सोपलांना ईडीची धमकी दिली आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT