अहमदनगर : खर्डा ( ता. जामखेड ) येथे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून भारतातील सर्वात उंच झेंडा भगवा ‘स्वराज्य ध्वज’ आज उभारण्यात आला. स्वराज्य ध्वज यात्रेचा प्रवास 9 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत झाला. 12 हजार किलोमीटरचा हा प्रवास होता. महाराष्ट्रातील 36 जिल्हे, देशातील 6 राज्यांचा प्रवास करत हा ध्वज आज खर्डा येथील शिवपट्टण किल्ल्या समोर फडकविण्यात आला. या प्रसंगी आमदार रोहित पवार यांनी स्वराज्य व भगव्या ध्वजाबाबत आपले विचार मांडत जात व धर्मावर राजकारण करणाऱ्यांवर जोरदार टीका केली. I will not allow the politics of flags and colors
आमदार रोहित पवार म्हणाले, एकता व समानतेच्या विचाराने जातीभेद व धर्मभेद विसरून आपण येथे स्वराज्य ध्वजाला मानवंदना देण्यासाठी आलो आहोत. काहीजण स्वराज्याच्या भगवा ध्वजाचा वापर ठराविक जाती अथवा धर्मापूर्ता करून जाती धर्मात विभाजन करत आहेत. जाती व धर्म भेदातून काहींना फायदा होतो म्हणून ते असे करतात.
आमदार रोहित पवार पुढे म्हणाले, स्वराज्य ध्वज हा महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या ताकदीचे प्रतीक आहे. मला या यात्रेतून पब्लिसिटी करायची नाही. त्यामुळे या यात्रेत मी सहभागी झालो नाही. भगवा ध्वज सर्वांसाठी आहे. ज्या ज्या परिसरात धार्मिक स्थळांवर, शौर्य स्थळांवर हा ध्वज गेला तेथे सर्वसामान्य कार्यकर्ते, नागरिकांनी या ध्वजाचे स्वागत केले. याचा मला अभिमान वाटतो. या यात्रेत केवळ ध्वजाला महत्त्व हा विचार मला पुढे न्यायचा होता.
मी विकासाचेच राजकारण करणार
आमदार पवारांनी राजकारणा विषयी मत मांडले की, काहीजण मला म्हणाले सुरवातीला तू विकासाविषयी बोलत होता. आता हे काय? त्यावर माझे उत्तर एकच आहे. मी विकासाचेच राजकारण करणार. ध्वजाचे व रंगाचे राजकारण मी होऊ देणार नाही. भगव्या ध्वजाचे राजकारण होऊ देणार नाही. काही लोक हा रंग हातात घेऊन त्यांचे राजकारण करतात ते होऊ द्यायचे नाही, असेही आमदार पवार यांनी स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की, एखादी नवी गोष्ट घेतली तर त्याचे पूजन होते. हीच संस्कृती महत्त्वाची आहे. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांनी घाट बांधले, रस्ते केले, विहिरी बांधल्या त्या सर्वांसाठी. त्यांनी ते काही केवळ कोणत्या जाती धर्मासाठी केले नाही. हा सर्व संत, महापुरूषांचा विचार आहे. सर्वांना एकत्र घेऊन हा माणुसकीचा विचार रूजवायचा आहे. माणुसकीला महत्त्व द्यायचे आहे. माणुसकीचे प्रतीक असलेला हा भगवा स्वराज्य ध्वज आहे. या स्वराज्य ध्वजाचे आज समतेचे, एकतेचे विचार घेऊन जाणाऱ्यांनी पूजन केले आहे. पूजन करणारे हे लोक सामान्य कुटूंबातील मात्र असामान्य ताकदीचे आहेत.
धार्मिक स्थळावर जाताना जसे आपण पायातील जोडे बाहेर ठेवतो, तहानलेल्याला पाणी, भुकेल्याला अन्न देतो याला आपली भारतीय संस्कृती म्हणतात. हाच तर स्वराज्याचा विचार होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य रयतेचे होते. त्यात 18 पगड जातींना विश्वसात घेतले जात होते. म्हणून येथील ध्वज स्तंभाचे वजन 18 टन ठेवले आहे.
परंदरच्या तहात स्वराज्याचे किल्ले द्यावे लागले पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांना विश्वासात घेऊन पुन्हा स्वराज्य निर्माण केले. आताचे स्वराज्य म्हणजे सरकारकडून सामान्यांसाठी येणारा रूपया न घसता सर्वसामान्यांना मिळवून देणे. हे स्वराज्य होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार पुढे न्यायचे आहेत. आपण येथे चांगला विचार घेऊन जाण्यासाठी आलो आहोत.
विचार उभा करणे आवश्यक
आगामी काळात लोक येथील स्वराज्य ध्वजापेक्षाही मोठा ध्वज उभा करतील. पण विचार उभा करणे आवश्यक आहे. काही लोक भेदभावाचे राजकारण करतात. त्यासाठी माथी भडकवतात. त्यातून सर्वसामान्यांचीच डोकी फुटतात, असे राजकारण होऊ देणार नाही. आता बदलाचे, चांगल्या विचारांचे वारे देशात, राज्यात सर्वत्र जावेत, अशी अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमात स्वराज्य ध्वजाचे पूजन वीरमाता व प्रसिद्ध व्याख्याता अनुराधा गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आमदार रोहित पवार, ज्ञानेश्वर जवळकर महाराज, राजाभाऊ चोपदार, रवींद्र पाटील, ज्ञानेश्वर रामदास, प्रशांत मोरे, प्रशांत सावंत, मनोहर ढमाले, शरद साबळे, विजयराज दरेकर, राहिबाई पोपरे, अभिजित सोनवणे, मंगला बनसोडे आदी मान्यवरांसह राज्यातील विविध ठिकाणचे नागरिक उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.