Solapur, 10 April : अनेकदा काम करूनही यश मिळत नाही, त्यामुळे निराश व्हायचं नसतं. एखादी मॅच हरली म्हणून विराट कोहिलीची बॅट थंड पडत नाही. पुढच्या मॅचमध्ये दुप्पट वेगाने गोलंदाजावर तुटून पडते आणि चॅम्पियन ट्रॉफी घरात येते, त्यामुळे शहाजीबापू चिंता करू नका. शहाजीबापूंसाठी मी एकच शब्द उचारतो, टायगर अभी जिंदा है. शहाजीबापूंना मी वाऱ्यावर सोडणार नाही. ‘हात बढाकर आसमॉ छू लेगे हम. अपनी हार को जीतमें बदल देंगे हम’ असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहाजीबापू पाटील यांच्या समर्थकांना शब्द दिला.
सांगोल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांंच्या पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शहाजीबापू पाटील यांच्याबाबत जाहीरसभेत भाष्य केले. या वेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री संजय शिरसाट, प्रकाश आबीटकर, शंभूराज देसाई, आमदार समाधान आवताडे, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख उपस्थित होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, बापू तुमच्यावरचं लोकांचं प्रेम बघून एकदम ओके वाटतंय. आभार यात्रेच्या निमित्ताने सध्या राज्यात फिरतोय, त्यामुळे शहाजीबापूंना मतदान करणाऱ्यांचे मी आभार मानतो. सांगोल्यात शहाजीबापू पाटील यांना यश आले नसले तरी तेच जनतेच्या मनातील नेते आहेत, हे मला माहिती आहे. आमदार, नामदार असूदे किंवा नसू दे एकनाथ शिंदे ज्यांच्या पाठीशी उभा आहे, त्यांना चिंता करण्याचे काही कारण नाही.
कार्यकर्ता हा काम करणारा असतो. त्याला हार जीतची पर्वा नसते. मला आपले आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी काही कामे सांगितली. मी म्हटलं काही काळजी करू नका. हा एकनाथ शिंदे असा आहे की, कुठल्या पक्षाचा आमदार आला, हे मी पाहिले नाही, त्याचे काम कसं होईल, एवढचं मी पाहिलं आहे. पण बापू तुमच्या मतदारसंघात साडेपाच हजार कोटी रुपयांचा निधी आला आहे. एवढा निधी कधीच आला नाही, असा दावाही शिंदे यांनी केला.
सांगोल्यात गणपतराव देशमुख आणि शहाजीबापू पाटील हे दोघेचे असतात. तिसरा कोणी नसतो, त्यामुळे अनेकदा काम करूनही यश मिळत नाही, त्यामुळे निराश व्हायचं नाही. लोकांनी मला काय दिलं, यापेक्षा मी लोकांना काय दिलं, हे लक्षात ठेवून काम करायचं असतं, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, शहाजीबापू पाटील हे स्पष्टवक्ते आहेत. मनातील ते भडाभडा बोलत असतात. काही दिवसांपूर्वी ते म्हणाले होते, ज्यांनी पाणी अडविले, त्यांना लोकसभेत पाठविले आणि ज्यांनी पाणी दिले, त्यांना तुम्ही घरी पाठवलं. असं बोलणारा हा मोकळा आहे. सांगोल्याचा दुष्काळ मिटविण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.