Rajendra Raut-Tejasvi Satpute-Dilip walse patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राऊतांना टोमणा मारत SP सातपुते यांची गृहमंत्र्यांनी केली पाठराखण!

चांगल्या पोलिस अधिकाऱ्यांना वाऱ्यावरही सोडणार नाही, असे सांगून गृहमंत्र्यांनी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची पाठराखण केली.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : बार्शीचे (जि. सोलापूर) आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी सोलापूर जिल्ह्यातील अवैध धंद्याबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला म्हणून त्यांना सोलापूर पोलिसांकडून टार्गेट केले जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी (ता. २४ मार्च) केला होता. त्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आज (ता. २५ मार्च) उत्तर दिले. एकीकडे अवैध धंदे बंद करा म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला ती कारवाई आपल्या मर्जीने करा, असा आग्रह धरायचा, याचा विचार करण्याची वेळ आली आहे, हे योग्य नाही. त्याउपरही आमदार राऊतांशी चर्चा करून मार्ग काढू; पण चांगल्या पोलिस अधिकाऱ्यांना वाऱ्यावरही सोडणार नाही, असे सांगून गृहमंत्र्यांनी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची पाठराखण केली. (I Will stand behind good police officers : Dilip Walse Patil)

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत बोलताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, आमदार राजेंद्र राऊत यांना टार्गेट केले जात आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला होता. मात्र, राऊत हे लोकप्रतिनिधी आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते या महिला अधिकारी आहेत. त्या धाडसाने काम करतात. दुसरीकडे बार्शी शहरातल पोलिसांकडे दारुबंदीबाबतच्या १६१ केसेस आहेत. त्यात वाढ होत आहे. अधिकाऱ्यांना सांगायचे की अवैध धंदे बंद करा आणि दुसऱ्या बाजूला आमच्या मर्जीनेच कारवाई करा, यासाठी आग्रह धरायचे. हे काही योग्य नाही. त्याबाबतचा विचार करायची वेळ आली आहे. त्यानंतरही आमदार राजेंद्र राऊत यांच्याशी चर्चा करून त्यातून मार्ग काढण्यात येईल. पण, हे करत असताना चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्या पाठीमागे उभे राहणार, असेही गृहमंत्र्यांनी ठणकावले.

फडणवीसांनी माहिती घेऊन आरोप करावेत

सोलापूरमध्ये एक सचिन वाझे आहे. हा क्राईम ब्रांचसाठी ६० लाख गोळा करतो. त्याचं स्टिंग ऑपरेशन झालेले आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्याला उत्तर देताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर येथील पोलिसांचे वसुली प्रकरण सभागृहात मांडले. मात्र, असे प्रकरण मांडण्याआधी त्यांनी थोडी माहिती घेणे गरजेचे आहे. या प्रकरणात ज्या माहिती अधिकार कार्यकर्त्याने स्टिंग ऑपरेशन केले, त्याच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात पोलीस दलाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. अवैध धंद्यांना पाठबळ दिले नाही, म्हणून अशा प्रकारे स्टिंग ऑपरेशन करुन आपल्यापर्यंत ती माहिती पोचवण्यात आली आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?

विधानसभेच्या सभागृहात बोलल्यावर प्रशासन डूख धरणार असेल तर योग्य नाही. बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी सोलापूर जिल्ह्यातील अवैध धंद्याबाबतचा विषय मांडला होता. त्यानंतर आमदार राऊत यांना टार्गेट केलं जातंय. तुमच्यावर गुन्हा दाखल करणार. तुमच्या मुलाला फसवणार असे त्यांना सांगितले जात आहे. अपक्ष निवडून आल्यानंतही ते आमच्यासोबत आहेत, म्हणूनच त्यांना त्रास दिला जात आहे, असेही फडणवीस यांनी आरोप केला हेाता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT