Ekanth Shinde, Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : औषधे मिळाली नाहीत, तर जिल्‍हाधिकाऱ्यांना फोन करा : पालकमंत्री देसाईंचा अजब फतवा

Umesh Bambare-Patil

Satara Civil Hospital News : शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्‍णांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा मिळणे आवश्‍‍यक आहे. प्रत्‍येक ग्रामीण रुग्‍णालयांत सहा महिने पुरेल इतका औषधसाठा करण्‍याच्‍या सूचना केल्‍या असून, त्‍यासाठी जिल्‍हा नियोजनमधून निधी देणार असल्‍याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याचवेळी त्‍यांनी शासकिय रुग्णालयात औषधे मिळत नसल्‍यास थेट जिल्‍हाधिकाऱ्यांना फोन करा, असे आवाहन देसाई यांनी नागरिकांना केले.

नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्‍णालयातील‍ मृत्‍यूसंख्‍येनंतर प्रत्‍येक जिल्‍ह्यातील आरोग्‍य सुविधांचा आढावा घेण्‍याच्‍या सूचना मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी दिल्‍या होत्‍या. यानुसार देसाई Shambhuraj Desai यांनी आज सातारा येथील जिल्‍हा शासकीय रुग्‍णालयास भेट देत औषधसाठ्याची पाहणी केली.

या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रवींद्रनाथ चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे उपस्‍थित होते. त्यानंतर देसाई यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला.

देसाई म्‍हणाले,‘‘ जिल्‍हा रुग्‍णालयास भेटीत त्‍या ठिकाणच्‍या औषधसाठ्याची पाहणी केली. येथील औषधसाठा दोन महिने पुरेल इतका असून, उर्वरित उपजिल्‍हा आणि ग्रामीण रुग्‍णालयातही तेवढाच औषधसाठा आहे. हा औषधसाठा किमान सहा महिने पुरेल इतका असणे आवश्‍‍यक असल्‍याने त्‍यासाठी जिल्‍हा नियोजनमधून ११ कोटी रुपये देण्‍यात आले आहेत. यातून स्‍थानिक पातळीवर आवश्‍‍यक औषध खरेदी करण्‍याच्‍या सूचना केल्‍या आहेत.’’

प्रत्‍येक आरोग्‍य केंद्रातील औषधसाठ्याची माहिती ॲपवर अद्ययावत करण्‍यात येणार असून, मागणीनुसार औषधे, साधनसामग्रीदेखील संबंधित ठिकाणी देण्‍यात येईल. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी थांबणे गरजेचे असून, जिल्हाधिकाऱ्यांची यंत्रणा रुग्णालयांना भेटी देऊन त्‍याची तपासणी करेल. कामाच्‍या ठिकाणी गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाई करण्‍याचे संकेतही या वेळी देसाई यांना दिले.

जिल्हा रुग्णालयाच्‍या अद्ययावतीकरण तसेच सांडपाणी व्‍यवस्‍थापनासाठी सहा कोटींचा निधी दिला आहे, असेही त्यांनी सांगितले. काही ठिकाणी रुग्‍णांना आवश्‍‍यक औषधे मिळत नसल्‍याचा प्रश्‍‍न उपस्‍थित केल्‍यानंतर देसाई यांनी असा प्रकार कोठेही होत नसल्‍याचे सांगितले. यावर काशिळ येथे अजूनही तसाच प्रकार सुरू असल्‍याचे सांगताच देसाई यांनी असा प्रकार कोठे आढळल्‍यास त्‍याची माहिती नागरिकांनी फोनद्वारे थेट जिल्‍हाधिकारी जितेंद्र डूडी यांना देण्‍याचे आवाहन केले.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT