Nagar jillha Hospital
Nagar jillha Hospital Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

...तर नगर जिल्हा रुग्णालयातील ११ जणांचा जीव वाचला असता!

सरकारनामा ब्यूरो

नगर : ज्या नगर जिल्हा रुग्णालयात कोविड अतिदक्षता विभागाचा वॉर्ड सुरू करण्यात आला होता, त्या कोविड अतिदक्षता विभागाचे फायर ऑडीट झाले होते. त्यातील त्रुटीही नगर जिल्हा शल्यचिकित्सकांना कळविण्यात आल्या होत्या. मात्र, त्यावर अंमलबजावणी झाली नाही. फायर ऑडीटमधील त्रुटी तातडीने दूर झाल्या असत्या तर आज कदाचित त्या ११ जणांचा जीव वाचला असता, अशी हूरहूर नगरमधील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. (If the errors in fire audit had been rectified, 11 lives would have been saved in nagar)

नगर शहरात सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण वेगात घटत आहे. नगर जिल्हा रुग्णालयात नवीन तयार केलेल्या कोविड विभागातील अतिदक्षता विभागात 17 कोविड रुग्ण उपचार घेत होते. त्यातील ११ जणांचा आज रुग्णालयाला आग लागून मृत्यू झाला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली होती, अशी अधिकृत माहिती समोर आली आहे. या कोविड अतिदक्षता विभागाचे फायर ऑडिट झाले होते. त्यातील त्रुटीही जिल्हा शल्यचिकित्सकांना कळविण्यात आल्या होत्या, मात्र त्यानुसार अंमलबजावणी झाली नाही.

कोरोना महामारीची साथ सुरू झाल्यावर जिल्हा रुग्णालयातील नवीन इमारतीत कोरोना उपचार सुरू करण्यात आले. त्यावेळी तेथे अतिदक्षता विभागही सुरू करण्यात आला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता पाहून या इमारतीच्या समोर ऑक्सिजन प्लांट उभा करण्यात आला.

जिल्हा रुग्णालयाचे 2015 व 2021 या वर्षांत फायर ऑडिट करण्यात आले होते. हे फायर ऑडिट नगर महापालिकेतील अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ यांनी केले होते. नवीन इमारतीतील अतिदक्षता विभागाचे फायर ऑडिट 2021 मध्येही करण्यात आले होते. यात मिसाळ यांनी पाच ते सहा त्रुटी जिल्हा रुग्णालयाला कळविल्या होत्या. यात फायर अलाराम, स्प्रिकंलर, पाण्याचे पंप, सेंसर आदी स्थायी अग्निशमन यंत्रणा नसल्याचे सांगत त्या त्वरीत बसविण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र आजतागायत या त्रुटी पूर्ण केल्या गेल्या नाहीत.

अतिदक्षता विभागात विद्युत तारांचा संच

कोविड अतिदक्षता विभागात विद्युत तारांचा संच होता. या संचात शॉर्टसर्किट होऊन अपघात झाला असावा. शॉर्टसर्किट झाल्यावर या विभागातील ऑक्सिजन पाईपने आग पकडली असावी. हा आगीचा भडका रोखण्यासाठी आवश्यक सुरक्षा साधने नसल्याने आग आटोक्यात येण्यास अडचण आली असावी.यातच पीओपीमुळेही धूर वाढला, असा अग्निशमन विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT