NCP Vs BJP : कर्जत, श्रीगोंदे आणि आष्टी तालुक्यांतील जिरायत भागाला वरदान ठरणाऱ्या सीना धरणाला काल (गुरुवारी) दोन वेळेस जलपूजनाचा मान मिळाला. सकाळी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) व आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांचे हस्ते, तर सायंकाळी माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे ( Ram Shinde ) व माजी मंत्री आमदार सुरेश धस यांचे हस्ते जलपूजन करण्यात आले. त्यामुळे सीना धरणातील जलपूजनावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे आमदार पवार व आमदार आजबे विरुद्ध भाजपचे आमदार शिंदे आणि आमदार धस यांच्यात श्रेयवादाची लढाई रंगणार असून, आगामी काळात आवर्तन व इतर बाबींवरून संघर्ष तीव्र होण्याची चिन्ह आहेत. मात्र यावरून राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांत समाज माध्यमावर जुंपली आहे.
कर्जत, श्रीगोंदे आणि आष्टी तालुक्यातील जिरायत भागाला वरदान ठरलेले सीना धारण दोन दिवसांपूर्वी पूर्ण क्षमतेने भरले. आज सकाळी आमदार रोहित पवार व आष्टीचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे हे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकऱ्यांसह सीना धरणावर आले. दोन्ही आमदारांच्या हस्ते जलपूजन पार पडले. जलपूजन झाल्यानंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू झाली.
त्यानंतर सायंकाळी चार वाजेच्या सुमारास माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे आणि माजी मंत्री आमदार सुरेश धस हे देखील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सीना धरणावर दाखल झाले. या वेळी या दोघांच्या हस्ते सीनात जलपूजन करण्यात आले. सायंकाळी दुसऱ्यांदा जलपूजन झाल्याची चर्चा पुन्हा सोशल मीडियावर रंगू लागली आणि पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रात राष्ट्रवादी आणि भाजप पदाधिकारी, समर्थक कार्यकर्त्यांत श्रेयवादाची लढाई सुरू झाली.
कार्यकर्त्यांत जुंपली
सीना धरण लाभक्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गावे येतात. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मेहेकरी धरण यातून भरले असून, त्याचा आष्टी तालुक्यातील गावांना सिंचन आणि पिण्यासाठी फायदा होणार आहे. जामखेड-कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि आष्टीत बाळासाहेब आजबे, तर जामखेड-कर्जतमध्ये भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे, तर आष्टीत सुरेश धस आहेत. या दोन्ही तालुक्यांत दोन-दोन आमदार असल्याने राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांत श्रेयवादाची ठिणगी पडून जुंपण्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.