Babanrao Autade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mangalvedha Politic's : चुलत्याच्या पक्षप्रवेशाला भाजप आमदाराची दांडी : मंगळवेढ्याच्या नगराध्यक्ष सुनंदा अवताडे, बबनराव अवताडेंसह 200 पदाधिकाऱ्यांनी हाती घेतले कमळ...

Babanrao Autade Join BJP : बबनराव अवताडे, सुनंदा अवताडे यांच्यासह दोनशे पदाधिकाऱ्यांनी सोलापुरात रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पाच नगरसेवक आणि दहा सरपंचांचाही समावेश होता. मात्र आमदार समाधान अवताडे यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 17 October : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव अवताडे, त्यांच्या पत्नी मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा सुनंदा अवताडे, समर्थक पाच नगरसेवक, बाजार समिती आणि खरेदी विक्री संघाचे सभापती यांच्यासह 10 गावचे सरपंच, सोसायटीचे पदाधिकारी यांच्यासह तब्बल 200 पदाधिकाऱ्यांनी आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या प्रवेशावेळी अवताडे यांचे पुतणे आणि मंगळवेढ्याचे आमदार समाधान अवताडे यांची अनुपस्थिती होती, त्याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती.

भारतीय जनता पक्षाचे पूर्ण विभागाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या पुढाकाराने हा बबनराव अवताडे यांच्या गटाचा पक्षप्रवेश झाला आहे. त्यामुळे आमदार समाधान अवताडे यांची अनुपस्थिती विशेष लक्षणीय ठरते.

मंगळवेढा नगरपरिषदेची निवडणूक बबनराव अवताडे यांच्या गटाने भगीरथ भालके यांच्यासोबत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून भाजपच्या विरोधात लढवली होती. त्या निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीने नगराध्यक्षांसह 9 जागा जिंकल्या होत्या. सत्ता स्थापनेनंतर काही महिन्यांतच स्वीकृत नगरसेवक व पक्षनेता निवडीवरून तीर्थक्षेत्र विकास आघाडीत फूट पडली होती.

तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे भगीरथ भालके, पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भालके यांच्यासह काही समर्थकांनी एप्रिल महिन्यात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंढरपुरात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर मंगळवेढ्यातील बबनराव अवताडे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती.

गेली दोन महिन्यांपासून अवताडे गटाच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. तो आज प्रत्यक्षात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत बबनराव अवताडे, मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांच्यासह 5 नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला.

मंगळेवढा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे, मंगळवेढा बाजार समितीचे सभापती सुशील अवताडे यांच्यासह 10 सरपंच, 40 ग्रामपंचायत सदस्य, 70 सोसायटी सदस्यांसह 200 पदाधिकाऱ्यांनी भाजपत प्रवेश केला. ऐन डीसीसी बँक आणि विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर अवताडे गटाने भाजपत प्रवेश केल्यामुळे तीर्थक्षेत्र विकास आघाडीतील फाटाफूट सर्वांसमोर आली आहे.

दरम्यान, या भाजप प्रवेशाला मंगळवेढ्याचे आमदार समाधान अवताडे यांची अनुपस्थिती होती. आमदार अवताडे हे भाजप असूनही त्यांनी या पक्षप्रवेशाकडे पाठ फिरवली. बबनराव अवताडे हे आमदार अवताडेंचे काका (चुलते) आहेत. विधानसभा आणि नगर परिषद निवडणुकीत हे काका-पुतणे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. त्यामुळे चुलत्याच्या भाजप प्रवेशाकडे अवताडे यांनी पाठ फिरवल्याची विशेष चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT