Prashant paricharak Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आम्हाला वाटतंय विठ्ठल कारखान्यात ‘ऑल इज वेल’ आहे : प्रशांत परिचारकांचे सूचक वक्तव्य

भारत नागणे

पंढरपूर : आम्ही अडचणीत आहोत आणि आमच्या कारखान्यात लक्ष घाला, असं म्हणून अजून माझ्याकडे कोणीही आलंलं नाही, त्यामुळे आम्हाला वाटतंय की श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात सर्व काही ‘ऑल इज वेल’ सुरू आहे, असं सूचक वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक यांनी केले. (Indicative statement of MLA Prashant Paricharak regarding Vitthal Sugar Factory)

पंढरपूरचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीमुळे संकटात आहे, त्यामुळे कारखाना यावर्षीही बंद राहण्याची शक्यता आहे. कारखाना बंद राहणार असल्याने तालुक्यातील ऊस गाळपाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. अशा प्रसंगी आमदार प्रशांत परिचारक यांनी विठ्ठल कारखाना सुरू करण्याबाबत लक्ष घालावे अशी विनंती पत्रकारांनी केली, त्यावेळी आमदार परिचारक यांनी वरील वक्तव्य केले.

ते म्हणाले की, कोणी कारखाना चालू करू अथवा न करो. आम्ही सर्व ऊस नेणार आहोत. आम्ही ऊस न्यायला सुरुवातही केली असून माझ्याकडे सुमारे दीड लाख टनांच्या नोंदी झाल्या आहेत. युटोपियन आणि पांडुरंग कारखान्याने त्या नोंदी घेतल्या आहेत. पण, मलाही मर्यादा आहेत. मी विठ्ठल कारखान्याचा सर्व दहा लाख टन ऊस गाळप करू शकत नाही. आमच्याकडून जे शक्य होईल, ते सहकार्य करू, असा शब्दही त्यांनी दिला. कारखाना सुरू करण्याबाबत आपण योग्य त्या प्लॅटफॉर्मवर काही मुद्दे मांडले आहेत. परंतु त्याचा विचार कधी होईल, हे सांगता येणार नाही, असेही परिचारक यांनी नमूद केले.

पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्याचा राजवाडा अशी ओळख असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना गैरव्यवस्थापनामुळे मागील हंगामापासून बंद आहे, त्यामुळे कारखान्यावर अवलंबून असलेल्या सुमारे 27 हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीमध्ये पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने विठ्ठलच्या सभासदांचा सुमारे दीड लाख टन उस गाळप करण्याचा निर्णय घेतला आहे. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे विठ्ठलच्या सभासदांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आमदार परिचारक म्हणाले विठ्ठल साखर कारखाना सुरु होेणे अत्यंत गरजेचे आहे. कारखाना बंद राहिला तर आणखी तोटा वाढू शकतो, शिवाय शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाचा प्रश्न निर्माण होतो. पांडुरंग आणि युटोपियन या दोन्ही साखर कारखान्यांकडे पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध आहे. तरीदेखील तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्यांना ऊसासाठी अन्यत्र धावपळ करावी लागू नये; म्हणून सर्व शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यानुसार विठ्ठलच्या ऊस उत्वादक सभसादांनी आतापर्यंत दीड लाख टन उसाच्या नोंदी पांडुरंग आणि युटोपीयन या दोन्ही साखर कारखान्यांकडे दिल्या आहेत. त्यानुसार त्यांच्या ऊसाचे गाळप केले जाणार असल्याचेही आमदार परिचारक यांनी सांगितले. पांडुरंग आणि युटोपियन या दोन्ही साखर कारखान्यांनी अडचणीच्या आणि संकट काळात विठ्ठलच्या सभासदांचा ऊस गाळप करण्याचा निर्णय घेतल्याने विठ्ठल परिवारातून त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

पांडुरंगच्या साखरेला सर्वाधिक 3600 रुपयांचा दर

ब्राझीलमध्ये यंदा दुष्काळ पडल्याने साखरेचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे जागतिक बाजारात साखरेला मागणी वाढली आहे. सध्या अंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या एम दर्जाच्या साखरेला प्रतिक्विंटल 3600 रुपये सर्वाधिक दर मिळाला आहे. साखरेची एसएमपी 3100 रुपये आहे. तरीही साखरेला सरासरी 3450 रुपये दर मिळाला आहे. साखरेच्या दरात वाढ झाल्याने याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. साखर कारखाने चालवताना ते अत्यंत काटकसरीने चालवणे आवश्यक आहे. प्रत्येक लहान सहान गोष्टींचा विचार करावा लागतो. आर्थिक शिस्त महत्वाची आहे. (कै.) सुधाकर परिचारकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही प्रामाणिकपणे कारखानदारी चालवली आहे. त्यामुळेच आम्ही साखर कारखानदारीत आणि राजकारणात टिकून असल्याचेही आमदार प्रशांत परिचारक यांनी या वेळी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT