Solapur, 18 July (प्रमिला चोरगी) : सोलापूर महापालिकेत भारतीय जनता पक्षाला मिळालेले पाशवी बहुमत पक्षासाठी ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ ठरणार की काय, असे सध्याचे राजकीय चित्र आहे. कारण सोलापूर भाजपमधील अंतर्गत संघर्ष अवघ्या सहा महिन्यांतच चव्हाट्यावर आला आहे. बॅंकेतील ठेवी, निवडणूक खर्चाचा हिशेब, सततचे दबावतंत्र आणि मनमानी कारभारामुळे पक्षातील गटबाजी तीव्र होत आहे. त्यातून स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचालीची चर्चा सोलापुरात जोरात सुरू आहे.
सोलापूर भाजपमध्ये आता उघड संघर्ष सुरू झाला आहे. उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या नेतृत्वाखाली पाच नगरसेवकांनी आपल्या पक्षाच्या कारभारावर बोट ठेवले आहे, त्यातून पक्षातील नाराजीला वाचा फोडली आहे. आता हा अंतर्गत संघर्ष कोणते वळण घेतो, हे पाहावे लागेल.
मुदतठेवी कळीचा मुद्दा
सोलापूर महापालिकेच्या मुदतठेवी ह्या बंधन बँकेत ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या ठेवण्यावरूनही वाद झाला होता. तो वाद अजून मिटलेला नसताना त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. बंधन बॅंक ही नवी आहे, त्यामुळे तेथील ठेवी आयसीआयसीआय बॅंकेत वर्ग करण्याचा करण्याचा निर्णय महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
स्थायी समितीमधील हा विषय फेरसादर करण्याचाही निर्णय झाला आहे. मात्र, तो विषय अद्याप समितीपुढे येण्यापूर्वीच शुक्रवारी नव्याने आक्षेप नोंदविण्यात आला आहे. उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेवक सत्यजित वाघमोडे, नगरसेविका अर्चना वडनाळ तसेच नगरसेवक किरण पवार आणि संकेत किल्लेदार यांनी आयसीआयसी बँकेऐवजी राष्ट्रीयकृत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) ठेवी ठेवण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. त्यामुळे ठेवींच्या निर्णयावरून सत्ताधाऱ्यांतील मतभेद पुन्हा उघड झाले आहेत.
निवडणूक खर्चाचे गौडबंगाल
महापालिका निवडणुकीच्या खर्चात कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या तक्रारीनंतर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने दिलेल्या अहवालात सुमारे सहा कोटी रुपयांची बिले देण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्याबाबतचा विषय स्थायी समितीची मान्यता मिळावी, यासाठी पाठविण्यात आलेला आहे. पण, स्थायी समितीने ही बिले अवाजवी असल्याचा आक्षेप घेत विषय पुन्हा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करा
या पार्श्वभूमीवर उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची भेट घेऊन निवडणूक खर्चाचा तपशीलवार हिशेब आणि खर्चनिहाय आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, कथित गैरव्यवहाराची चौकशी करून त्याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही शिष्टमंडळाने केली.
निवडणूक बिलांची फेरचौकशी : आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे
निवडणुकीदरम्यान जवळपास सहा कोटींची बिल महापालिकेकडे सादर करण्यात आली आहेत. सादर केलेली बिले आणि प्रत्यक्षात झालेला खर्च यात मोठी तफावत आहे, अशी तक्रार पाच नगरसेवकांनी केलेली आहे. त्या तक्रारीनुसार बिले समितीकडे पुन्हा फेरचौकशीसाठी पाठविण्यात येणार आहेत. तसेच महापालिकेच्या २८ कोटींच्या ठेवीबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे, असे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले.
नगरसेवकांनी माझ्याशी बोलायला हवे होते : नरेंद्र काळे
पक्षाची शिस्त प्रत्येकाने पाळली पाहिजे. मी महापालिकेतच असतो. नगरसेवकांचे काही विषय असतील तर त्यांनी मला सांगणे अपेक्षित आहे. पण ते माझ्याकडे आलेले नाहीत. या विषयाबाबत मला कोणती माहिती नाही, त्याची माहिती घेऊन तुम्हाला सांगतो, असे स्पष्टीकरण सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.