Sangali News : सांगली जिल्ह्यातील कामेरी जिल्हा परिषदेच्या गटात माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांच्यासमोर महायुतीचे तगडे आव्हान असणार आहे. गेल्यावेळी महाविकास आघाडीचा फायदा झाल्यानंतर यंदा मात्र आमदार सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, आमदार सदाभाऊ खोत यांच्या राजकीय ताकदिचा सामना आमदार पाटील यांना करावा लागणार आहे. कामेरी गटाचे आरक्षण खुले झाल्याने इच्छुकांची गर्दी होईल, अशी चिन्हे आहेत.
महायुतीकडून जयराज पाटील, विक्रम पाटील तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित पाटील, डॉ. रणजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजीराव नाईक गटाचे एम. के. जाधव, शहाजी पाटील रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महायुतीला आणि महाविकास आघाडीला देखील उमेदवारीवरून कसरत करावी लागणार आहे. मात्र, जयंत पाटलांच्या किल्ल्यात महायुतीने तगडे आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्भूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सांगलीतील पश्चिम भागातील कामेरी जिल्हा परिषद गटात भाजपचे आमदार सत्यजित देशमुख, सदाभाऊ खोत व सम्राट महाडिक गटांचे प्राबल्य आहे. त्यांच्या गटाचे नेते जयराज पाटील, विक्रम पाटील यंदा इच्छुक आहेत. तर आमदार जयंत पाटील (Jayant Patil) व माजी आमदार मानसिंगराव नाईक गटाचे सत्ताकेंद्र असलेल्या गटात यंदा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित पाटील, डॉ. रणजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजीराव नाईक गटाचे एम. के. जाधव, शहाजी पाटील हे इच्छुक आहेत.
या गटात यंदा तेरा गावांचा समावेश आहे. गत निवडणुकीत माजी आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांच्या गटाविरोधात विकास आघाडी स्थापन केली. शिवाजीराव नाईक गटाच्या सुरेखा मोहन जाधव यांनी जयंत पाटील गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य छाया पाटील यांचा 423 मतांनी पराभव केला होता.
कामेरी गणात महाविकास आघाडीच्या सविता शहाजी पाटील यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिभा छगन पाटील यांचा 59 मतांनी पराभव केला. ऐतवडे बुद्रुक गणात जयंत पाटील गटाच्या धनश्री माने यांनी नाईक गटाच्या अलका काळुगडे यांचा 143 मतांनी पराभव केला होता. जयंत पाटील यांच्या हातून पूर्ण गट गेला.
यावेळी भाजपचे (BJP) स्थानिक नेते जयराज पाटील यांनी सुरुवातीपासूनच मतदार संघावर पकड ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. वाढदिवसानिमित्त आमदार खासदारांना बोलवून शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. 'जयराज पाटील यांना जिल्हा परिषदेत पाठवा', असा सर्वानी नारा दिला आहे. त्यामुळे जयराज पाटील जोमाने कामाला लागले आहेत. त्यांनी वाढदिवसाला घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार शिवाजीराव नाईक यांना निमंत्रित केले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर थोडीफार नाराजी आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून कामेरी जिल्हा परिषद गटासाठी उद्योजक एम. के. जाधव व कामेरी गणासाठी शहाजी पाटील इच्छुक आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, आमदार सदाभाऊ खोत यांनी कामेरी जिल्हा परिषद गटात विकास निधी देण्याचा धडाका लावला आहे. गेल्या निवडणुकीत कामेरी गटाच्या सदस्य सुरेखा जाधव व गणाच्या सविता पाटील यांनी त्यांच्या काळात चांगली विकासकामे केली.
कामेरी गटाच्या सदस्य सुरेखा जाधव यांचे पती एम. के. जाधव व कामे्री गणाच्या सविता पाटील यांचे पती शहाजी पाटील यांनी उमेदवारीसाठी माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्याकडे मागणी केली आहे. इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. याशिवाय, माजी सरपंच अतुल पाटील, शुभम पाटील, माजी उपसरपंच रणजित पाटील इच्छुक आहेत. त्यामुळे निवडणूक अटीतटीची होणार आहे का, याबद्दल उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.