Sangli News : शिंदे फडणवीस सरकारने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तब्बल तीनवेळा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराच्या चौकशीला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, शिंदे फडणवीस सरकाराच्या या आदेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या अडचणीत वाढ झाली आहेत.
याचदरम्यान, सांगली जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
दिलीप पाटील हे जयंत पाटील यांचेही ते निकटवर्तीय मानले जातात. वाळवा ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळवल्यानंतर चर्चेत आले होते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 2015 मध्ये त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. ते पुढे सहा वर्षे अध्यक्षपदावर कायम राहिले. सांगली लोकसभेच्या उमेदवारीसाठी जयंत पाटलांनी त्यांच्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते.
तसेच दिलीप पाटील यांनी राजारामबापू पाटील यांच्या अत्यंत जवळचे युवा नेतृत्व म्हणून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. मात्र,आता दिलीप पाटील यांच्या फेसबुक पोस्टने सांगली जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे.
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. सत्तेच्या व सुडाच्या प्रवासात पहिल्यांदा निष्ठावंत संपवले जातात असं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. मात्र, फेसबुक पोस्टद्वारे त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे हे याबाबत जिल्ह्याच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यामुळे जयंत पाटील (Jayant Patil) व दिलीप पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. तसेच याबाबत 31 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तीनवेळा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची चौकशीला स्थगिती देण्यात आली होती. शिंदे सरकारने 31 डिसेंबर रोजी स्थगिती आदेश मागे घेत चौकशीचे आदेश दिले.
काय आहे प्रकरण ?
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तब्बल तीनवेळा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची चौकशीला स्थगिती देण्यात आली होती. दिलीप पाटील हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष असतानाच बँकेतील नोकर भरतीतील घोटाळा, कर्ज वाटपातील अनियमितता, बँकेच्या कामकाजातील गैरव्यवहारासंबंधी आऱोप करण्यात आले होते.
महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार आणि सध्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असलेल्या मानसिंगराव नाईक यांनीच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बँकेतील गैरकारभाराबाबतची तक्रार सहकार विभागाकडे केली होती. आता पुन्हा शिदे सरकारने सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची चौकशी करण्याबाबत आदेश देत राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना झटका असल्याचं मानलं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.