ncp sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

जयंत पाटील म्हणतात; निवडणुका एकत्र लढू, शक्य नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढतीची तयारी

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा समारोप संकल्प सभेच्या माध्यमातून उद्या कोल्हापुरात होणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : येत्या निवडणुकांमध्ये शक्य तिथं एकत्र लढू. जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढती होतील, असे सांगतानाच आमची प्राथमिकता महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याला राहील, अशा सर्वच शक्यतांचा सूचक इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे. कोल्हापुरात बोलताना मैत्रीपूर्ण लढतीचा विषय सुरू करून पाटील यांनी राज्याच्या राजकारणाची आगामी दिशा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.

आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका राज्यातील महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याची भूमिका तीन्ही पक्षांच्या नेत्यांकडून वारंवार व्यक्त केली जात आहे. या पाश्‍र्वभूमीवर जयंत पाटील यांनी आज जाहीर केलेली भूमिका प्रथमच काहीसा वेगळा विचार करणारी आहे. शक्य तिथं आम्ही एकत्रित लढू असे सांगताना काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, असे सांगण्यास ते विसरले नाहीत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा समारोप संकल्प सभेच्या माध्यमातून उद्या कोल्हापुरात होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या सभेत मार्गदर्शन करणार आहेत. या पाश्‍र्वभूमीवर परिवार संवाद यात्रेचा राज्यभराचा आढावा त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केला. ते म्हणाले, ‘‘ गेल्या महिन्याभरात राज्यातील सर्व भागात जवळपास अडीचशे विधानसभा मतदारसंघात परिवार संवाद यात्रा पोचली. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज्याच्या सर्वच भागातून यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांसोबत खरोखरीच संवाद साधण्यात यश मिळाले.’’

या यात्रेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळालेला प्रतिसाद आत्मविश्‍वास आणि उत्साह वाढविणारा आहे. राज्याच्या कोणाकोपऱ्यात राष्ट्रवादीचा विचार पोचविण्यात आम्ही यशस्वी झाल्याचे या यात्रेच्या निमित्ताने स्पष्ट झाल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले. उद्या (ता.२३) यात्रेच्या समारोपाची होणारी सभा मोठी असेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद या सभेच्या माध्यमातून दिसेल, असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला. या सभेला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार असून पक्षाचे राज्यातील सर्व नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT