Shivajirao Naik will Join NCP
Shivajirao Naik will Join NCP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

याला म्हणतात राजकारण : जयंतरावांच्या विरोधी आघाडीचा असा झाला `करेक्ट कार्यक्रम!`

सरकारनामा ब्यूरो

शिराळा : माजी मंत्री शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) यांनी अडचणीतील संस्थांना वाचवण्यासाठी राजकीय समझोता केल्याने आता शिराळा विधानसभा आणि तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. नाईक विरुद्ध नाईक संघर्षाला पूर्णविराम मिळाला असला, तरी नाईक विरुद्ध देशमुख की महाडिक याबद्दल आता उत्सुकता असेल.

शिराळा तालुक्याचे गेल्या चार-पाच दशकांचे राजकारण नाईक-देशमुख-नाईक अशा गटांभोवती फिरणारे आहे. २०१४ नंतर भाजपाच्या घौडदौडीत राज्यभर राजकारणाचा पोत बदलला तसाच शिराळ्यातही. विरोधकांना वश करताना सर्वकाही माफ ही भाजपची भूमिका राहिली. त्यात सत्यजित देशमुख यांचा भाजप प्रवेश घडवत आधीच भाजपवासी झालेल्या माजी मंत्री शिवाजीरावांसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली. त्यावेळी शिवाजीरावांना मंत्रिपदाची अपेक्षा होती, मात्र ते मिळाले नाही.

२०१९ ला सत्यजित देशमुखांचा भाजपप्रवेश आणि सम्राट महाडिक यांना आपलेसे केले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर ‘तुम्ही एक आमदार द्या, आम्ही तुम्हाला दुसरा आमदार देऊ’, अशी पेठ नाक्यावर घोषणाच केली. मात्र सम्राट महाडिकांच्या बंडखोरीने शिवाजीराव नाईक यांना बॅकफूटवर जावे लागले. त्या संधीचा फायदा घेत राष्ट्रवादीकडून मानसिंगराव नाईक यांनी राजकीय मैदान मारले. शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख यांची एकजूट होऊनही महाडिक यांच्या बंडखोरीचा त्यांना मोठा फटका बसला. त्यानंतर शिवाजीरावांना विधानपरिषदेत संधी मिळेल अशी चर्चा होती. तेच सत्यजित देशमुखांबाबत झाले. राज्यातील सत्तांतरामुळे नवीच समीकरणे पुढे आली. त्यात शिराळा तालुक्यात भाजपसाठीची राजकीय पोकळी वाढतच गेली.

शिवाजीरावांच्या अडचणीत आलेल्या संस्था आणि त्याचवेळी त्यांना भाजपमध्ये कितपत भवितव्य याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार व जिल्हा मध्यवर्ती बँकेवरील राष्ट्रवादीची सत्ता, यामुळे नाईक यांना भाजपपेक्षा राष्ट्रवादीत भविष्य दिसू लागले. मंत्री जयंतराव पाटील यांच्याविरोधात नाईक, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, निशिकांत पाटील, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, प्रताप पाटील, जितेंद्र पाटील, सी. बी. पाटील अशी उभी राहिलेली विरोधी आघाडीची मोट हळूहळू विस्कटत गेली. त्याचवेळी जयंतरावांनी पुन्हा एकदा खासदार धैर्यशील माने व मानसिंगराव नाईक यांच्या रूपाने लोकसभा-विधानसभा खेचत वाळवा आणि शिराळा तालुक्यावरील वर्चस्व सिद्ध केले. मानसिंगरावांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद दिले. त्यामुळे शिवाजीरावांना तसेच चिरंजीव रणधीर नाईक यांच्यासमोर राष्ट्रवादीचा पर्याय खुणावत होता.

आगामी जिल्हा परिषद निवडणुका समोर ठेवत जयंत पाटील यांनी जिल्हाभर पुन्हा एकदा मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नाईकांशी समझोता त्या मिशन झेडपीचा प्रारंभ आहे. मानसिंगरावांसाठीही मतदार संघाची सुरक्षितता वाढली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती, बाजार समिती व शिराळा नगरपंचायत या ठिकाणी राष्ट्रवादीच्या वर्चस्वासाठी जयंतरावांनी टाकलेले हे पाऊल विरोधी आघाडीसमोरचे आव्हान असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT