Jayant Patil
Jayant Patil Sarkaenama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'त्या' वक्तव्यावर जयंत पाटील यांचे घुमजाव

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Politics : पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार (Sharad Pawar) यांची खेळी असून शकते, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले होते. त्या वक्तव्यावर आता त्यांनी घुमजाव केला आहे. यावेळी ते म्हणाले की, पहाटेच्या शपथविधीबाबत अनेकजण वेगवेगळे तर्कवितर्क रंगवत आहेत. मात्र त्या घटनाक्रमांमुळे महाविकास आघाडीचे सरकार येण्यास फायदा झाला.

पहाटेच्या शपथविधीला तीन वर्षे पूर्ण झाले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दि. 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे भाजपचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार (Ajit Pawar) यांना उप मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. तो पहाटेचा शपथविधी म्हणून प्रसिद्ध आहे. तो शपथविधी सोहळ आजही चर्चेचा विषय आहे. त्याबाबत ती पवारांची खेळी असू शकते असं वक्तव्य राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आता मात्र त्यांनी या वक्तव्यावर घुमजाव केला आहे.

जयंत पाटील म्हणाले, "पहाटेच्या शपथविधीमागे पवारांचा हात असल्याचे चित्रं रंगविले जात आहे. मात्र ते खरे नाही. त्या घटनाक्रमामुळे आमचं सरकार येण्यासाठी फायदा झाला. अनेक लोकांनी वेगवेगळे अर्थ काढले. कारण त्यावेळी राष्ट्रवादीतील सर्वांचाच अप्रत्यक्षरित्या त्याला पाठिंबा असल्याचे समजलं गेलं. पण तशी परिस्थिती, वस्तूस्थिती नव्हती. त्यानंतर त्या घटनाक्रमाचा फायदा हा राष्ट्रपती राजवटी हटून आमचं सरकार स्थापन होण्यासाठी झाला. त्यामुळं ते सर्व कुणी जाणीवपूर्वक केलं, असं मी म्हणणार नाही. पण त्याचे फायदे जे झाले, ते आपल्या सर्वांसमोर आहेत."

दरम्यान जयंत पाटील यांच्यावर भाजपचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी निशाना साधला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, हा गौप्यस्फोट त्यावेळीच जयंत पाटील यांनी का केला नाही? जयंत पाटील यांना हे उशिरा सुचलेलं शाहणपण आहे. दरम्यान अनेक घडामोडी घडल्या असून राजकारणात अशा माहितीला काहीच अर्थ नसतो.

आमदार रोहीत पवार (Rohit Pawar) यांनीही जुन्या गोष्टींवरील खपल्या काढण्यात काही अर्थ नसल्याचे म्हणाले. ते म्हणाले, पहाटेच्या शपथविधी आता जुनी गोष्ट झाली आहे. आता कुणीही काहीही सांगू शकत नाहीत. त्यावर फक्त शरद पवार, अजित पवार हेच भाष्य करू शकतात. जुन्या गोष्टींवरील खपल्या काढत बसणं सोडून सामान्य नागरिकांच्या समस्यांवर लक्ष देणे बरं पडेल.

काय म्हणाले होते जयंत पाटील

"राज्यात त्यावेळी राष्ट्रपती राजवट होती. ती उठविणं गरजेचं होते. त्या अनुषंगाने पहाटेचा शपथविधी ही एखादी खेळी असू शकते. ती गोष्ट जुनी असून त्याला जास्त महत्त्व देणं उचित नाही. त्यानंतर अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. त्यानंतर राष्ट्रवादी फुटली नाही. शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी केली आणि सरकार कोसळलं. राष्ट्रवादीने शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांना ठामपणे साथ दिली."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT