Jaykumar Gore  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jaykumar Gore : गोरेंचा अतिआत्मविश्वास भाजपला नडला; 'या' चुकीमुळे माढ्यासह सोलापूर गमावला....

Madha Loksabha Election Result Analysis : महाविकास आघाडीतून लढलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टी या पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळत महायुतीतून मैदानात उतरलेल्या भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पराभवाचे तोंड पहायला लागले.

रूपेश कदम

Maan Political News : संपुर्ण देशात गाजलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपवर पराभवाची नामुष्की ओढवली. माढ्यात आमदार जयकुमार गोरेंचा अतिआत्मविश्वास भाजपला नडला. उमेदवार निवडीतील चुकीमुळे हक्काच्या माढ्यासह सोलापूर सुध्दा भाजपला गमवावा लागल्याची चर्चा संपुर्ण माढ्यात रंगली आहे.

2009 ला अस्तित्वात आल्यापासून शरद पवार यांचा मतदारसंघ म्हणून माढा लोकसभा चर्चेत आला. शरद पवार, विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून या मतदारसंघाचे नेतृत्व केल्यानंतर भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सत्तांतर करत या मतदारसंघाचे नेतृत्व केले. यंदा मात्र महाविकास आघाडीतून लढलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टी या पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळत महायुतीतून मैदानात उतरलेल्या भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पराभवाचे तोंड पहायला लागले.

रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा पराभव हा त्यांचा नसून किंगमेकर बनू पाहणाऱ्या आमदार जयकुमार गोरे यांचा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्याला कारणे सुध्दा तशीच आहेत. 2019 साली आमदार जयकुमार गोरे यांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष करण्यापासून ते भाजपची माढ्याची उमेदवारी मिळवून देण्यापर्यंत महत्वाची भूमिका बजावली. एवढेच नव्हे तर स्वतः काँग्रेस मधून राहून भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना माढ्यातून निवडून आणण्याची किमया साध्य केली. यात त्यांना अकलूजच्या मोहिते-पाटील यांची मोलाची साथ मिळाली. कालांतराने मोहिते-पाटील व नाईक-निंबाळकर, गोरे यांच्यातील मतभेदांची दरी रुंदावत गेली.

यंदा भाजपकडून धैर्यशील मोहिते-पाटील तसेच राष्ट्रवादी (अजित पवार) कडून संजीवराजे नाईक-निंबाळकर माढ्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. तर आमदार जयकुमार गोरे हे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारीसाठी ठाम होते. पक्षांतर्गत घेतलेल्या आढाव्यात रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विरोधात वातावरण मतदारसंघात दिसून येत होते. मात्र आमदार जयकुमार गोरे यांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावली. आणि रामराजे नाईक-निंबाळकर व मोहिते-पाटील घराण्यांचा विरोध फाट्यावर मारत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी मिळवून दिली. एवढेच नव्हे तर रामराजे व मोहिते-पाटील यांना डावलत माढ्यातील इतर दिग्गजांची मोट बांधून ती रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठीमागे उभी केली.

परंतू इथून पुढे त्यांचे आडाखे चुकत गेले. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी कितीही भाषणबाजी केली तरी ते व त्यांचे कुटुंब भाजपच्या विरोधात जाण्याचे धाडस करणार नाही अशी आमदार गोरे यांची धारणा फोल ठरली. तसेच मोहिते-पाटील घराण्याचे वलय संपले असून आर्थिक डबघाईला आलेल्या संस्था, कर्जे व भाजपकडून विधान परिषद सदस्य असलेले रणजितसिंह मोहिते-पाटील यामुळे मोहिते-पाटील घराणे भाजपच्या विरोधात बंड करणार नाही या भ्रमाला धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीमुळे तडा गेला. तसेच खास मित्र उत्तमराव जानकर हे सोबत राहतील यासाठी केलेला खटाटोप सुध्दा वाया गेला.

  • रामराजे व मोहिते-पाटील यांना गृहीत धरणे तसेच हलक्यात घेणे महागात पडले.

  • माझं गणित चुकत नाही हा आत्मविश्वास नडला.

  • माळशिरसचे लिड माणमधून वजा करणार ही वल्गना हवेत विरली.

  • सांगोला वगळता सर्वच मतदारसंघात कमी अधिक प्रमाणात अंदाज फसले.

  • माढा व करमाळा या दोन विधानसभा मतदारसंघांनी अनपेक्षित जोरदार दणका दिला.

एवढे सगळे घडल्यानंतर रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यापेक्षा आमदार जयकुमार गोरे यांनी माढा मतदारसंघ पिंजून काढला. सत्तेच्या माध्यमातून साम, दाम, दंड व भेद या सर्व नितींचा वापर करुन अनेक नेत्यांना महायुतीच्या छावणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्याला काही प्रमाणात यश सुध्दा आले. परिस्थिती कठीण दिसत असताना शेवटच्या टप्प्यात मतदारांना विविध प्रलोभने दाखविण्यात आली. या प्रलोभनांना काही मतदार बळी पडले. पण बहुतांशी मतदारांनी प्रलोभनांना बळी न पडता जे ठरवले तेच केले.

या सर्वांचा परिणाम निकालादिवशी समोर आला. आमदार जयकुमार गोरे यांच गणित फसलं अन रणजितसिंह नाईक-निंबाळकर पर्यायाने भाजपवर पराभवाची नामुष्की ओढवली. शरद पवार - विजयसिंह मोहिते-पाटील - सुशीलकुमार शिंदे यांचा एकत्रित करिष्मा सोलापूर मध्ये सुध्दा चालला अन ती जागा सुध्दा भाजपच्या हातून निसटली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT