Solapur, 23 January : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळूमाफियांकडे दुर्लक्ष केल्याची कबुली सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत टेंभुर्णीतील एका कार्यक्रमात दिली होती. त्यानंतर माढ्याच्या प्रांताधिकाऱ्यांची गाडी अडवून त्यांना धक्काबुक्की करण्याची घटना बुधवारी रात्री घडली. सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यात कोणत्याही माफियाचे राज्य चालू देणार नाही, असा इशारा दिला. त्यामुळे विखे पाटलांचे खरं धरायचं की गोरेंचा इशारा गांभीर्याने घ्यायचा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
टेंभुर्णीतील एका खासगी कार्यक्रमासाठी आलेले जलसपंदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. जिल्हाधिकारी आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या उपस्थितीत विखे पाटील यांनी मागे पालकमंत्री असताना वाळू-क्रेशरच्या गाड्यांकडे दुर्लक्ष करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले होते, अशी जाहीर कबुलीच दिली होती.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ((Radhakrishna Vikhe Patil)) यांनी ही कबुली दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माढ्याच्या प्रांताधिकारी प्रिया आंबेकर यांची गाडी वाळू माफियांनी आडवून त्यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे, त्यामुळे विखे पाटलांच्या विधानामुळे वाळू माफियांना बळ मिळाले की काय, अशी चर्चा रंगली होती. ते विधान तस्करांचे बळ वाढविणारे ठरले का, अशी चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे.
दरम्यान, सोलापूरचे पालकमंत्री आज प्रथमच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. पंढरपूरमध्ये त्यांना माढ्याच्या प्रांताधिकारी प्रिया आंबेकर यांना झालेल्या धक्काबुक्की विचारण्यात आल्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यात कोणत्याही माफियाचे राज्य चालू देणार नाही, असे म्हटले आहे. सोलापूर जिल्ह्यात आणि राज्यात कुठलाही अधिकारी आणि जनतेला त्रास होऊ देणार नाही. सोलापूर जिल्ह्यातून लवकरच माफिराज संपलेले दिसेल. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीपात्रातूून होणारी वाळूचोरीही थांबलेली दिसेल, असेही गोरे यांनी म्हटलेले आहे.
गोरेंच्या दौऱ्यात ठेकेदारांची गर्दी
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सोलापूर दौऱ्याला सकाळी शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या दर्शनानंतर सुरुवात झाली. नातेपुते, मांडवे, माळशिरस, वेळापूर, वाखरी, इसबावी, पंढरपूर आदी ठिकाणी गोरे यांचे जल्लोषात स्वागत झाले. मात्र, त्यांच्या स्वागताला भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांपेक्षा सर्वपक्षीय नेते आणि ठेकेदारांची मांदियाळी दिसून आली. कामे मिळविण्याच्या उद्देशाने पालकमंत्री गोरे यांच्या स्वागताचे अनेकांनी बॅनर लावले होते. निष्ठावंतांपेक्षा संधीसाधू कार्यकर्ते आणि ठेकेदारांची संख्या अधिक होती हे ठळकपणे दिसून आले. भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याने याबाबत नाराजीही व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.