कन्नड : तालुक्यातील घराणेशाही, गुत्तेदारी, कृषी दौलतीची दुकानदारी संपुष्टात आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मी झेंडा हाती घेतला आहे, असे अपक्ष उमेदवार मनोज पवार यांनी जाहीर केले.
अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या मनोज पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य कृषिभूषण भाऊसाहेब थोरात, जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्हिडिओ कॉलवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
ते म्हणाले, की कन्नड तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक आंदोलने केली. कन्नड तालुक्यात दोन साखर कारखाने होते. कन्नडचा कारखाना स्वस्तात विकला, दुसरा हिराजी कारखाना सुरू न करताच त्याची जमीन विक्री केली. मनोज पवार यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी विधानसभेत पाठविण्याचा निर्णय घेतला. आता पवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परिवर्तन महाशक्तीचे पुरस्कृत उमेदवार आहेत.
स्वराज्य पक्षाचे नेते छत्रपती संभाजीराजे, प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे शंकर आण्णा धोंडगे, वामनराव चटप या परिवर्तन महाशक्तीचे घटक पक्षाचे नेते, कार्यकर्ते मनोज पवार यांना विधानसभेत प्रचंड बहुमताने निवडून आणतील असा विश्वासही राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. तर, मनोज पवार यांनी पिशोरचा हिराजी साखर कारखाना सुरू करण्यासाठी मला विधानसभेत संधी द्यावी, असे आवाहन केले.
यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश बोरसे, जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रामेश्वर भुसारे, गणपत खरे, निसार पठाण, दिनकर पवार, मुक्तेश्वर चव्हाण, शिवाजी बचाटे, नितिन बारगळ, संदीप गायकवाड, बाळू कवडे, राजू बोंगाणे, सुदाम जगताप, सचिन गायके आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कृषीभूषण भाऊसाहेब थोरात म्हणाले, की तालुक्यात एकाच घराण्यात सत्तावीस वर्षे सत्ता दिली तरी तेच विकासाच्या मुद्द्यावर मते मागत आहेत.
महायुतीच्या उमेदवार संजना जाधव यांनी खऱ्या कार्यकर्त्यांना डावलून उमेदवारी मिळवली. शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते खरे संघर्षपुत्र आहेत. विद्यमान आमदार राजपूत यांनी गत निवडणुकीत माझी सर्व प्रॉपर्टी गहाण आहे असे भावनिक करून मते घेतली. आज त्यांच्या संपत्तीने पाचच वर्षांत कोटींची झेप घेतली. राजपूत यांनी कृषी दौलतीचा हा फॉर्म्युला तालुक्यातील शेतकऱ्यांना द्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.