MLA Rohit Pawar
MLA Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

विक्रमी स्वराज्य ध्वज उभारणीसाठी खर्डा किल्ला झाला सज्ज : रोहित पवारांनी केली पाहणी

Amit Awari

अहमदनगर : खर्डा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व आमदार रोहित पवार यांच्या अनोख्या संकल्पनेतून उतरलेल्या विक्रमी उंचीच्या भगव्या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना विजयादशमीच्या (दसरा) मुहूर्तावर केली जाणार आहे. या निमित्त किल्ल्याला सज्ज केले जात आहे. किल्ल्या समोरील एतिहासिक मैदान मोठ्या कार्यक्रमासाठी तयार केले जात आहे. या कामाची पाहणी आज रोहित पवार यांनी केली. या कार्यक्रमासाठी रोहित पवार यांनी देशातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे. Kharda fort ready for record-breaking Swarajya flag: Rohit Pawar inspects

Kharda Fort

लवकरच होणाऱ्या या स्वराज्य ध्वजाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याबाबत राज्यभरात उत्सुकता वाढीस लागली आहे. दरम्यान रोहित पवार यांनी आज स्वत: या सोहळ्याच्या स्थळाची म्हणजे खर्डा भुईकोट किल्ल्याला भेट देऊन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी कर्जत-जामखेडमधील ग्रामस्थांचीही भेट घेतली.

या प्रसंगी रोहित पवार म्हणाले, कर्जतकर नागरिक आणि सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनीही वेळात वेळ काढून आज खर्डा किल्ल्याच्या परिसरात स्वच्छता केली. याबाबत मी त्यांचा मनापासून आभारी आहे. कोणत्याही सामाजिक कार्यात ही मंडळी स्वतःहून सहभाग घेतात, यातच कर्जतचं वेगळेपण आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. असे उद्गार काढून त्यांनी सहभागी कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.

खर्ड्याच्या किल्ल्यासमोर दसऱ्याच्या दिवशी झळकणाऱ्या भगव्या 'स्वराज्य ध्वजा'च्या स्तंभाची पाहणी करून कार्यक्रमासाठी लोकसहभागातून सुरू असलेल्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला. तसंच यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत नियोजनाबाबत चर्चा केली.

कर्जत-जामखेड तालुक्याला नवी ओळख मिळवून देणारा हा स्वराज्य ध्वज अनेकांसाठी आता आदर्श प्रेरणा बनला आहे. 74 मीटर अशा विक्रमी भगव्या स्वराज्य ध्वज पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरण्याची शक्यता आहे. 37 दिवसांचा अहोरात्र प्रवास करत, 96 शक्तिपीठे आणि प्रेरणास्थळांना वंदन करत, महाराष्ट्रातील 36 जिल्हे व इतर पाच राज्यांना भेट देऊन पुन्हा राज्यात पोहोचलेला हा भगवा स्वराज्य ध्वज उंच झळकत राहणार आहे. खर्ड्याच्या ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यासमोर 'स्वराज्य ध्वज' उभारणीच्या कार्यक्रमाची लोकसहभागातून जोरदार तयारी सुरू झाली आहे.

किल्ल्याचा परिसर स्वच्छ केला जात असून तिथली जुनी तळी, विहिरी देखील साफ केल्या जात आहेत. युवावर्गाने उत्साहाने या ध्वजारोहणाच्या निमित्ताने होणाऱ्या स्वच्छता मोहिमेत अत्यंत उत्साहाने भाग घेतल्याचं चित्र दिसत आहे. या ध्वजाचा आकार 96X64 फूट आहे. ध्वज स्तंभाचे वजन 18 टन असून नुसत्या ध्वजाचे वजन 90 किलो आहे. 55,500 चौरस फूट आकार असलेला हा ध्वज देशात सर्वांचे आकर्षण ठरला आहे. असा हा मंगल ध्वज कर्जत-जामखेडवासीयांसाठी सध्या अभिमानाचा विषय आहे. ध्वज प्रतिष्ठापना आणि ध्वजारोहणाच्या निमित्ताने या किल्ल्याची डागडुजी केली जात आहे.

Kharda

या किल्ल्याची निर्मिती सरदार राजे निंबाळकर यांनी 1743 साली केली होती. इ.स 1795 मध्ये अहमदनगर जवळ खर्डा या ठिकाणी हैदराबादच्या निजामाला मराठ्यांनी पाणी पाजले. ही अखेरची शौर्यगाथा याच शिवपट्टण किल्ल्याच्या परिसरात लिहिली गेली. हा ऐतिहासिक किल्ला जामखेड जवळ खर्डा या ठिकाणी आजही भरभक्कम अवस्थेत उभा आहे. अभेद्य तटबंदी असणारा हा किल्ला सहा खणखणीत बुरुजांनी संरक्षित आहे. आता येत्या दसऱ्याला अवघ्या राज्याचं नवं स्वप्न असणाऱ्या या भगव्या स्वराज्य ध्वजाची सन्मानाने दिमाखदार प्रतिष्ठापना होईल आणि पुन्हा एकदा या किल्ल्यासमोर नवा विक्रमी इतिहास रचला जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT